जळगाव : अंगणात लावलेल्या डीजेच्या वाहनातील किमती सामान चोरी करणा-या तिघा चोरट्यांना मुद्देमालासह पारोळा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. रोहित शिवाजी पाटील, गणेश रघुनाथ पवार आणि रोहित उर्फ श्याम नाना पाटील तिघे रा. तामसवाडी ता. पारोळा अशी अटक करण्यात आलेल्या तिघा चोरट्यांची नावे आहेत.
तामसवाडी येथील रहिवासी दिलीप देवीदास चौधरी यांनी त्यांच्या ताब्यातील डीजेचे आयशर वाहन त्यांच्या अंगणात लावले होते. या वाहनातील 50 हजार रुपये किमतीचे 4 व्हिसीपी लाईट, 20 हजार रुपये किमतीची पायलट पेटी, 8 हजार रुपये किमतीचे कॉर्डलेस माईक व 10 हजार रुपये किमतीचा आवाज कमी जास्त करण्याचा मिक्सर असा एकुण 88 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला होता.
या घटनेप्रकरणी दिलीप चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांना रोहीत शिवाजी पाटील याचे नाव समजले. युक्ती वापरुन पो.नि. रामदास वाकोडे यांनी एका खासगी इसमाला त्याच्याकडे चोरीचा मुद्देमाल विकत घेण्यास पाठवले. चोरीचा माल विक्री करण्यास रोहित तयार झाला. त्यामुळे त्याने डीजेचा सामान चोरल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार चोरीचा माल खरेदी विक्रीची वेळ ठरवण्यात आली. त्या वेळेवर इतरत्र साध्या वेशात सापळा रचून पोलिस तैनात करण्यात आले. रोहीत यास चोरीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतल्यानंतर त्याने इतर दोघा साथीदारांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे कबुल केले. त्यानुसार गणेश रघुनाथ पवार आणि रोहित उर्फ श्याम नाना पाटील यांना देखील गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आले.
अटकेतील तिघा चोरट्यांना न्या. काझी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली. अधिक चौकशीअंती तिघांनी तामसवाडी येथील शाळेतून गेल्या जून महिन्यात टीव्ही चोरी केल्याचे देखील कबुल केले आहे. एका गुन्ह्याच्या तपासात व चौकशीत अगोदरचा चोरीचा गुन्हा देखील उघडकीस आला आहे. अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक प्रदीप पाटील, पो कॉ हेमचंद्र साबे, पो कॉ राहुल पाटील,आशिष गायकवाड यांनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला.