नाशिक : अप्पर पोलीस महासंचालक, नागरी हक्क संरक्षण, म.रा. मुंबई यांनी राष्ट्रीय मानव अधिकार आयोग, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार सन २०२२ – २३ साठी मानव अधिकार जनजागृती’ प्रित्यर्थ परिक्षेत्रीय स्तरावर ” सर्व पोलीस दलात मानवी हक्काविषयी संवेदनशीलपणा वाढवणे हे पोलीसांच्या यशाची गुरुकिल्ली आहे’ या विषयावर वादविवाद स्पर्धा आयोजित करण्याचे सुचित केले होते.
त्या अनुषंगाने दि. २८/१०/२०२२ रोजी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखरपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्रीय स्तरावर नाशिक ग्रामीण अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार व पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांच्याकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्यासाठी वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक स्पर्धकासाठी ५ मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. या स्पर्धेत नाशिक ग्रामीण २, अहमदनगर – ३, धुळे – ३, जळगाव – ३, नंदुरबार – २ व पोलीस आयुक्त, नाशिक शहर ४ असे एकुण १७ स्पर्धक सहभागी झाले होते.
या स्पर्धेचे परिक्षक म्हणुन वादविवाद स्पर्धा समिती अध्यक्ष अकबर पठाण (पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण नाशिक परिक्षेत्र, नाशिक), श्रीमती माधुरी कांगणे / केदार (समिती सदस्य तथा अप्पर पोलीस अधिक्षक, नाशिक ग्रामीण), शैलेश जाधव (समिती सदस्य तथा पोलीस उप अधीक्षक – वाचक, विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय, नाशिक परिक्षेत्र, नाशिक) असे पोलीस विभागातील अधिकारी त्याचप्रमाणे खाजगी परिक्षक डॉ. हारुण रशिद कादरी (समिती सदस्य तथा प्र. प्राचार्य एन.बी.टी. लॉ. कॉलेज, नाशिक) व राम खैरनार (समिती सदस्य तथा संचालक युनिव्हर्सल फौंडेशन, नाशिक) यांचे परिक्षक म्हणुन मोलाचे सहकार्य लाभले.
या स्पर्धेत श्रीमती नविता दिलीप घुगे, महिला पोलीस उपनिरीक्षक, दोषसिध्दी शाखा, नाशिक ग्रामीण यांनी प्रथम क्रमांक, श्रीमती सुवर्णा हांडोरे, महिला सहा. पोलीस निरीक्षक, नाशिक रोड पोलीस ठाणे, नाशिक शहर यांनी द्वितीय क्रमांक व पोना डॉ शरद पाटील, अंमळनेर पोलीस ठाणे, जळगाव यांनी तृतीय क्रमांक मिळवून राज्य स्तरावर होणा-या वादविवाद स्पर्धेसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. यशस्वी स्पर्धकांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरवण्यात आले. स्पर्धेदरम्यान पोलीस दलात मानवी हक्काविषयी संवेदनशीलपणा वाढवणे या विषयावर अकबर पठाण, पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, शैलेश जाधव, पोलीस उप अधीक्षक (वाचक), विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, हारुण रशिद कादरी, प्र. प्राचार्य एन.बी. टी. लॉ कॉलेज, नाशिक व राम खैरनार, संचालक युनिव्हर्सल फौंडेशन, नाशिक यांनी उपस्थित स्पर्धक पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राज्य स्तरावर होणा-या स्पर्धेसाठी वकृत्वस्पर्धेबाबत मार्गदर्शन केले. सदर स्पर्धा समर्पण हॉल, विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय, गडकरी चौक, नाशिक या ठिकाणी यशस्वीपणे संपन्न झाली.