लातूर : शेतीच्या वाटणीपत्राच्या आधारे फेर करुन सातबा-याला नोंद घेतली म्हणून लाचखोर तलाठ्याने पाच हजार रुपयांची लाच मागीतली व स्विकारली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात तो तलाठी अडकल्याची घटना आज दुपारी सव्वा बारा वाजता लातूर येथे घडली. प्रमोद माधवराव सुर्यवंशी (तलाठी-उदगीर) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.
तक्रारदार याच्या मौजे हेर शिवारातील शेतीच्या वाटणीपत्राच्या आधारे फेर करुन सात बा-याला तलाठी प्रमोद सुर्यवंशी यांनी नोंद घेतली होती. या कामाच्या मोबदल्यात तलाठी प्रमोद सुर्यवंशी यांनी तक्रारदारास पाच हजाराची मागणी केली होती. ती रक्कम तक्रारदारास द्यायची नव्हती. तक्रारदाराने याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभाग लातूर यांना तक्रार दिली होती. याप्रकरणी रचलेल्या सापळयात लातूर येथील विवेकानंद चौकातील होंडा शोरुमच्या समोर लावलेल्या एसीबीच्या जाळ्यात तलाठी अलगद सापडला. त्याला लाचेच्या रकमेसह अटक करण्यात आली.
श्रीमती कल्पना बारवकर, पोलिस अधिक्षक नांदेड परिक्षेत्र, अप्पर पोलिस अधिक्षक नांदेड परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधिक्षक माणीक बेंद्रे व पोलिस निरिक्षक बाबासाहेब काकडे व त्यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.