जळगाव : तक्रारदाराकडे लाचेची मागणी करण्यास पोलिस उप निरीक्षकास प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली सावदा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक देविदास इंगोले सध्या एसीबीच्या ताब्यात आहेत.
एसीबीच्या ताब्यात असलेले स.पो.नि.देविदास इंगोले कमालीचे भाऊक झाले असून त्यांनी दुपारचे जेवण देखील नाकारले. अनेकांनी त्यांना जेवण करण्याचा आग्रह केला. मात्र त्यांनी दुपारचे जेवण करण्यास नकार दिला. आपण या गुन्ह्यात निर्दोष असून आपल्याला गोवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता आपल्याला आत्महत्या करायची असून जगायचे नाही असे त्यांनी भाऊक होत म्हटले आहे. ज्या पोलिस स्टेशनचे आपण प्रभारी आहोत त्याच पोलिस स्टेशनला आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे म्हणत स.पो.नि. इंगोले कमालीचे भाऊक झाले.
बलात्कारासह पोस्कोच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपीच्या वडीलांकडे सावदा पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक समाधान गायकवाड यांनी 15 हजार रुपयांची लाच मागीतल्याची तक्रार एसीबीकडे आली होती. स.पो.नि. देविदास इंगोले यांनी लाच प्रकरणी पीएसआय गायकवाड यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. या आरोपामुळे एसीबीच्या ताब्यातील स.पो.नि. देविदास इंगोले कमालीचे व्यथीत झाले आहेत. गेल्या पावसाळ्यात गारबर्डी धरणाला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या नऊ जणांचे प्राण वाचवण्यात स.पो.नि. इंगोले यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने प्रयत्नांची शर्थ लावली होती. यासह विविध गुन्ह्याच्या तपासकामात कसोटी लावणारे स.पो.नि. एसीबीच्या ताब्यात असतांना मात्र कमालीचे अस्वस्थ झाले.