तलाठ्याने पकडले वाळूचे ट्रॅक्टर ; चालकाने पळवले परस्पर

जळगाव : विनापरवाना वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडल्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात घेवून जाण्यास तलाठ्याने चालकाला सांगितले. मात्र चालकाने ते ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्याऐवजी परस्पर पळवून नेण्याचा प्रकार केला. याशिवाय तलाठ्याच्या दुचाकीची चावी काढून घेण्यात आली. या घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला ट्रॅक्टर चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावखेडा बुद्रुक गावानजीक गिरणा नदीपात्रातून वाळूची चोरटी वाहतुक करणारे ट्रॉलीसह ट्रॅक्टर तलाठी रविंद्र श्रीरंग घुले (सजा धामणगाव) यांना आढळून आले. या ट्रॅक्टर – ट्रॉलीचा पंचनामा झाल्यानंतर चालक नितीन किसन कुंभार (मयुर कॉलनी पिंप्राळा) यास त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात घेवून जाण्यास तलाठी रविंद्र घुगे यांनी सांगितले. ट्रॅक्टरमधे चालकासोबतच संबंधित महसुल अधिकारी अथवा कर्मचा-यांनी बसून जायचे असते असे म्हटले जाते. मात्र या घटनेत तलाठी रविंद्र घुले यांनी ट्रॅक्टर चालकास त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर प्रामाणीकपणे जिल्हाधिकारी कार्यालयात घेवून जाण्यास कथन केले.

ट्रॅक्टर चालक नितीन कुंभार याने ते ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्याऐवजी परस्पर पळवून नेले. आपल्या वाहनाची चावी देखील कुंभार याने काढून घेतल्याचा आरोप तलाठी घुले यांनी केला आहे. ट्रॅक्टर चालक नितीन कुंभार व मालक फैजल खान अस्लम खान या दोघांविरुद्ध जळगाव तालुका पोलिस स्टेशनला तिन हजार रुपये किमतीच्या वाळू चोरीसह महसुल कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास हे.कॉ. प्रविण पाटील करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here