जळगाव : पाचोरा येथून अल्पवयीन मुलास तर चोपडा आणि मुक्ताईनगर येथून अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुला मुलींना पळवून नेण्याच्या घटना चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे.
पाचोरा तालुक्यातील निपाणे येथील निखील प्रविण पाटील या सतरा वर्षाच्या मुलास नगरदेवळा ते चाळीसगाव प्रवासादरम्यान 6 नोव्हेंबर रोजी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याप्रकरणी त्याच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार कैलास पाटील पुढील तपास करत आहेत.
चोपडा शहरातील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवत पळवून नेल्याप्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक संतोष चव्हाण पुढील तपास करत आहेत. याशिवाय मुक्ताईनगर येथील एका अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक प्रदीप इंगळे पुढील तपास करत आहेत.