जळगाव : समन्स बजावणी अहवालावर दोघा साक्षीदार पोलिस कर्मचा-यांसह पंच अशा तिघांच्या बनावट सह्या करणा-या महिला पोलिस कर्मचा-याविरुद्ध एरंडोल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिला पोलिस कर्मचा-याने आपली चुक एरंडोल न्यायालयात मान्य केली असून पहिल्यांदाच आपल्याकडून अशा प्रकारची चुक झाल्याचे म्हटले आहे.
सविता रोहिदास पाटील या महिला पोलिस कर्मचारी कासोदा पोलिस स्टेशनला कार्यरत आहेत. समन्स बजावणी अहवालावर कासोदा पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले साक्षीदार म्हणून पोलिस शिपाई जितेश संजय पाटील, महादू संतोष पाटील तसेच पंच नितीन वसंतराव पवार रा. कासोदा या तिघांच्या सह्या आपण केल्याचे महिला पोलिस कर्मचारी सविता पाटील यांनी कबुल केले आहे.
कागदपत्रांचे, न्यायालयीन अभिलेख्याचे बनावटीकरण, बनावट दस्तावेज खरा म्हणून वापरल्याचे तसेच दस्तावेज बनावट असल्याचे माहिती असून देखील तो खरा म्हणून वापरण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगल्याचे तसेच न्यायालयाची दिशाभुल केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे मत फिर्यादीत व्यक्त करण्यात आले आहे. एरंडोल दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे सहायक अधिक्षक अनिल नारायण पाटील यांनी याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे करत आहेत.