जळगाव : जळगाव जिल्हयात सतत मोटार सायकल चोरीच्या घटना घडत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघा मोटार सायकल चोरट्यांसह त्यांच्या ताब्यातील पंधरा मोटार सायकली जप्त केल्या आहेत. चोपडा तालुक्यातील अडावद येथील दिपक संजय शेटे आणि नविद शेख इजाज अशी अटक करण्यात आलेल्या मोटार सायकल चोरट्यांची नावे आहेत.
दिपक शेटे आणी नविद शेख हे दोघे मोटार सायकल चोरटे चोरलेल्या मोटार सायकली कमी किमतीत विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकातील पोहेकॉ गोरखनाथ बागुल, पोहेकॉ संदिप रमेश पाटील, पोहेकॉ अश्रफ शेख, पोहेकॉ संदिप सावळे, पोना. प्रविण मांडोळे, पोना. परेश महाजन, पोना. रविंद्र पाटील, पोकॉ लोकेश माळी, चापोहेकॉ भारत पाटील, चापोकॉ. प्रमोद ठाकूर आदींचे एक पथक तयार केले. या पथकाला तपासकामी रवाना करण्यात आले.
एलसीबी पथकाने पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिपक संजय शेटे रा. प्लॉट भाग, अडावद ता. चोपडा व नविद शेख इजाज रा. मनियार अळी, अडावद ता.चोपडा जि.जळगांव दोघांना सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले. दोघांकडून पोलिसी पद्धतीने विचारपूस करुन माहिती घेतली असता त्यांनी आपला गुन्हा कबुल केला.
चोपडा, अमळनेर, यावल, धुळे जिल्हयातील शिरपूर, थाळनेर व मध्यप्रदेश राज्यातील बलकवाडा जि.खरगोन येथून मोटार सायकल चोरी केल्याचे त्यांनी कबुल केले. चौदा गुन्ह्यातील एकुण पंधरा मोटारसायकली त्यांनी काढून दिल्या असून त्या जप्त करण्यात आल्या. चोपडा शहर पोलिस स्टेशनला दाखल पाच, अमळनेर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील एक, यावल पोलीस स्टेशनला दाखल एक, शिरपूर पोलिस स्टेशनला दाखल सात, थाळनेर पोलिस स्टेशनला दाखल एक अशा एकुण पंधरा मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या असून हे गुन्हे उघडकीस आले आहेत.