नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या नांदूरशिंगोटे येथील दरोड्याच्या घटनेतील एकुण सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच वावी येथील आणखी एका दरोडयासह मालमत्तेचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. वावी पोलीस स्टेशन हद्दीत 24 ऑक्टोबर 2022 रोजी पहाटेच्या वेळी नांदूरशिंगोटे गावातील रहीवासी संतोष गंगाधर कांगणे व रमेश तुकाराम शेळके यांच्या घरात सहा दरोडेखोरांनी कुलुप तोडून प्रवेश केला होता. लोखंडी पहार व चाकुचा धाक दाखवत घरातील सदस्यांना काठीने मारहाण केली होती. या घटनेत लाकडी बेडमध्ये ठेवलेले सुमारे 132 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 2 लाख 75 हजार असा एकुण 6 लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी नेला होता. या घटनेप्रकरणी वावी पोलिस स्टेशनला गु.र.न. 247/22 भा.द.वि. 395, 397 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांच्यासह अप्पर पोलिस अधिक्षक श्रीमती माधुरी कांगणे यांनी घटनास्थळाला भेटी दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच वावी पो.स्टे. चे सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या पथकाने या गुन्हयातील घटनास्थळाच्या सीसीटीव्हीची बारकाईने पाहणी करत तपासाला दिशा दिली. फुटेजमधील आरोपींचे कपडे, त्यांचे वर्णन, त्यांची गुन्हा करण्याची पद्धत आणि गोपनीय माहितीचा आधार घेत तपास पथके रवाना करण्यात आली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी येथून संशयीत रविंद्र शाहू गोधडे रा. राजदेरवाडी, सोमनाथ बालु पिंपळे रा. मनमाड फाटा, लासलगाव, करण नंदू पवार रा. इंदिरानगर, लासलगाव आणि दिपक तुळशीराम जाधव, रा. चंडिकापुर, वणी, ता. दिंडोरी अशा चौघांना चौकशीकामी ताब्यात घेतले. अधिक चौकशीअंती त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. दिवाळीच्या दिवशी पहाटेच्या वेळी आपल्या साथीदारांच्या मदतीने नांदूरशिंगोटे येथील दरोडयाच्या गुन्ह्याची कबुली दिली. ताब्यातील चौघांना अटक करण्यात आली. अटकेनंतर अधिक चौकशीअंती चौघांनी त्यांचे साथीदार सुदाम बाळु पिंपळे, रा. राजदेरवाडी, ता. चांदवड, बाळा बाळु पिंपळे, रा. गुरेवाडी, ता. सिन्नर, करण उर्फ दादु बाबु पिंपळे, रा. गुरेवाडी या तिघांचा देखील या गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली. त्यामुळे त्या तिघांना देखील शिताफीने अटक करण्यात आली.
सर्वांनी मिळून वावी हद्दीतील नांदुरशिंगोटे येथील दरोड्यासह सिन्नर, वाडीव-हे, मनमाड आदी पोलिस स्टेशन अंतर्गत मोटार सायकल चोरीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहेत. सुदाम बाळु पिंपळे, बाळा बाळु पिंपळे, करण उर्फ दादु बाबु पिंपळे या तिघांना सोलापुर तालुक्यातील बाभुळगाव परिसरातून अटक करण्यात आली. या तिघांना पोलिस अधिकारी व कर्मचा-यांनी सलग दोन दिवस वेशांतर करुन ठावठिकाणा काढत मध्यरात्री सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या कब्जातुन दरोड्यातील सोन्याचे नेकलेस, लक्ष्मीहार, गंठन, पॅन्डल, कानातले वेल, सोन्याची चैन, अंगठी, डोरले, नथ, झुबे, पोत असे एकुण 127 ग्रॅम वजनाचे 5 लाख 69 हजार 970 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 8 मोबाईल, 5 मोटार सायकली असा एकुण 2 लाख 2 हजार 445 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटकेतील आरोपी सराईत गुन्हेगार असुन त्यांच्याविरुद्ध नाशिक ग्रामीण जिल्हयातील विविध पोलीस स्टेशनला चोरी, जबरी चोरी, घरफोडी असे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याच्या तपासात अटकेतील आरोपींकडून सिन्नर व बारामती पोलीस स्टेशन हद्दीतील मोटर सायकल चोरीचे काही गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून घरफोडी, चोरी व दरोडयाचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निफाड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सपोनि सागर शिंपी, सपोनि मयुर भामरे, वावी पोलीस स्टेशनचे सपोनि सागर कोते यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार ज्ञानदेव शिरोळे, हे.कॉ. रविंद्र वानखेडे, जालिंदर खराटे, नवनाथ सानप, दिपक आहिरे, पोना विनोद टिळे, सुशांत मरकड, सचिन पिंगळ, विश्वनाथ काकड, प्रितम लोखंडे, सागर काकड, मंगेश गोसावी, संदिप लगड, गिरीष बागुल, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम तसेच हे.कॉ. उदय पाठक, वसंत खांडवी, नामदेव खैरनार, भगवान निकम, प्रशांत पाटील, गणेश वराडे, सतिष जगताप, नवनाथ वाघमोडे आणि वावी पोलीस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक गवळी, सोनवणे, तांदळकर, सहायक फौजदार अढांगळे, हे.कॉ. बैरागी, मोरे, पोना जगताप, चव्हाणके, शिंदे, पोकॉ मोंढे, जाधव, तांबे, आडके यांनी तपासकामी सहभाग घेतला. या कामगिरीबद्दल पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांनी तपास पथकास 25 हजार रुपयांचे बक्षीस दिले असून त्यांचे अभिनंदन केले आहे.