जळगाव : एमआयडीसी परिसरातून 87 हजार 480 रुपये किमतीच्या ज्वारीच्या 54 गोण्या चोरुन नेणा-या तिघांना अटक करण्यात आली आहे. सैय्यद कमर अली, फारुख अब्दुल रज्जाक कच्छी आणि राहत अली सैय्यद कमर अली (तिघे रा. वरणगाव ता. भुसावळ) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
सुनील भगीरथ जाखेटे आणि विनायक ज्ञानदेव राणे या दोघा व्यापा-यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात धान्याची दुकाने आहेत. 11 नोव्हेंबरच्या सकाळी सहा वाजता जाखेटे यांच्या दुकानातून 39 व राणे यांच्या दुकानातून 15 ज्वारीच्या गोण्या चोरी झाल्याचे उघड झाले. चोरी झालेल्या धान्याची एकुण किंमत 87 हजार 480 रुपये एवढी होती. दोघा व्यापा-यांनी हा प्रकार धान्य बाजार समितीचे सचिव रमेश माळी यांना कथन केला. दोघा व्यापा-यांसह सचिव माळी यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात बोरेलो पिकअप व्हॅन (MH 04-EL 8302) मधून तिघे चोरटे ज्वारीचे पोते वाहून नेतांना त्यांना दिसून आले. त्या वाहनावर त्यांनी पाळत ठेवली. दुपारी दोन वाजता ते वाहन बाजार समितीमधे पुन्हा आल्याचे दिसताच त्यांनी वाहनासह दोघांना पकडले. दरम्यान दोघांचा तिसरा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला.
पकडलेल्या दोघांना एमआयडीसी पोलिस स्टेशनला आणून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या ताब्यातील सैय्यद कमर अली आणि फारुख अब्दुल रज्जाक कच्छी या दोघांकडून त्यांचा तिसरा फरार साथीदार राहत अली सैय्यद कमर अली याचे नाव निष्पन्न झाले. एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी, सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले, रामकृष्ण पाटील, सचिन पाटील, पोलीस चालक इम्तियाज खान, साईनाथ मुंडे आदींच्या पथकाने तिस-या साथीदारास देखील अटक केली. तिघांना न्यायालयात हजर केले असता सुरुवातीला तिघांना मंगळवार 15 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीमधून यापुर्वी देखील अशाच प्रकारच्या चो-या झाल्या असून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अटकेतील तिघांनी चोरी केलेल्या धान्याची कुठे कुठे विक्री केली याचा तपास केला जात आहे.