जळगाव : “अध्यक्ष टायगर गृप श्रीरामपूर” असे मागच्या बाजूने लिहिलेल्या चारचाकी वाहनातून शिर्डी येथील काही तरुण मध्य प्रदेशातील उमर्टी येथे गावठी पिस्टल व जिवंत काडतुस विकत घेण्यासाठी जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली होती. गावठी पिस्टल विकत घेतल्यानंतर ते वाहन पुन्हा श्रीरामपूर येथे जाणार असल्याची अधिकची माहिती देखील पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे चोपडा येथे लावलेल्या सापळ्यात दोघेजण पोलिस पथकाच्या हाती लागले.

पोलिस उप निरीक्षक अमोल देवढे, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ महेश आत्माराम महाजन, पोना रविद्र रमेश पाटील, पोना परेश प्रकाश महाजन, पोकॉ दिपककुमार फुलचंद शिंदे, चापोकॉ मुरलीधर सखाराम बारी आदींचे पथक चोपडा येथे तैनात करण्यात आले होते. या पथकाकडून चोपडा शहरातील शिवाजी चौकात उमर्टीकडून येणा-या वाहनांची तपासणी करण्यात आली.
दरम्यान रात्री अकरा वाजेच्या सुमारास MH-15 DM 7778 हे संशयीत चारचाकी वाहन पोलिसांच्या ताब्यात आले. या वाहनाची तपासणी केली असता त्यातील पायदानाखाली चार गावठी पिस्टल, दोघांच्या पॅंटच्या खिशात प्रत्येकी पाच जिवंत काडतूस पोलिस पथकाला आढळून आले. राजेंद्र ऊर्फ पप्पू भिमा चव्हाण आणि गणेश ज्ञानेश्वर सातपुते (दोघे रा. श्रीरामपूर अहमदनगर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून चार गावटी पिस्टल, दहा जिवंत काडतुस, तिन मोबाईल हॅंडसेट आणि चारचाकी वाहन असा एकुण 8 लाख 8 हजार तिनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यांना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.
अटकेतील राजेंद्र ऊर्फ पप्पू भिमा चव्हाण हा अहमदनगर जिल्हयांत पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध बरेच गुन्हे दाखल असल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात दोघांविरुद्ध शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.







