पतीच्या प्रेमसंबंधाचा संशय – पत्नीला जमावाकडून मारहाण

On: November 17, 2022 8:54 AM

जळगाव : आपल्या पतीचे गावातील परस्त्रीसोबत प्रेमसंबंध असल्याचा पत्नीला संशय आला. पत्नीने पतीकडून शहानिशा न करता थेट संबंधीत परस्त्रीला विचारणा केली. माझ्या नव-याचे तुझ्यासोबत प्रेमसंबंध आहे किंवा कसे? याबाबत विचारणा केल्याने संबंधीत परस्त्रीला राग आल्याने जमावाकडून झालेल्या मारहाण प्रकरणी यावल पोलिस स्टेशनला दंग्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील सांगवी खुर्द या गावी रहात असलेल्या विवाहीतेला आपल्या पतीचे गावातील एका महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याची शंका आली. त्या विवाहीतेने संबंधीत परस्त्रीकडे थेट विचारणा केली. याचा राग आल्याने दोघा महिलांमधे सुरुवातीला शाब्दीक खडाजंगी झाली. त्यानंतर त्या परस्त्रीसह तिची दोन्ही मुले, एक महिला व सुन असे पाच जण एकवटले. त्यांनी प्रेमसंबंधाची शंका उपस्थित करणा-या विवाहीतेला केस पकडून शिवीगाळ करत मारहाण सुरु केली. आपल्या आईला होत असलेली मारहाण बघून तिची मुले तिचा बचाव करण्यासाठी धावून आली. त्या दोघा मुलांना देखील पलीकडच्या गटाकडून काठीने मारहाण करण्यात आली.

पतीच्या प्रेमसंबंधाची शंका घेणारी जखमी विवाहीता व तिची दोन्ही जखमी मुलांवर यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचार करण्यात आला. जखमी विवाहितेने दिलेल्या जवाबानुसार सर्व पाच जणांविरुद्ध यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस उप निरीक्षक विनोद खांडबहाले तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment