नवी दिल्ली : देशाला हादरवून देणाऱ्या श्रद्धा हत्याकांडात दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत. आफताब पूनावाला याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्याची मागणी देशभरातून विविध संघटनांच्या माध्यमातून केली जात आहे.
शुक्रवारी साकेत न्यायालयाने रोहिणी फॉरेन्सिक सायन्स लॅबला येत्या पंधरा दिवसात आफताबची नार्को टेस्ट करण्याचे आदेश दिले आहे. आरोपीच्या संमतीनेच आरोपीची नार्को टेस्ट केली जाते. नार्को टेस्ट करायला तयार आहे का? असे न्यायालयाने त्याला विचारले होते. त्यावेळी त्याने संमती दिली होती.
आफताबवर थर्ड डिग्रीचा वापर न करण्याचे निर्देश देखील न्यायालयाने दिले आहेत. श्रद्धा हत्याकांडातील संशयीत आरोपी आफताबने चौकशीच्या दरम्यान पोलिसांना बऱ्याच घटना कथन केल्या आहेत. श्रद्धाची गळा दाबून हत्या केल्यानंतर बाहेरुन आणलेल्या करवतीने त्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. दरम्यानच्या कालावधीत त्याने मद्यप्राशन आणि जेवण देखील केले होते. साकेत न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ केली आहे.