जळगाव : पाटणादेवी जंगल परिसरात चंदनाच्या झाडांची तोड करुन गाभा चोरी करणा-या चोरट्यास चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. अटकेतील चंदनचोराचे साथीदार अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. सादिक नवीखा पठाण (रा. कुझखेडा भिल्ल वस्ती ता. कन्नड जि. औरगांबाद) असे अटक करण्यात आलेल्या चंदन चोरट्याचे नाव आहे.
पाटणादेवी जंगल परिसरातून चंदनाच्या झाडांची बेकायदा कत्तल होत असून त्यातील गाभा चोरी होत असल्याची माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे शोध पथकांची निर्मीती करण्यात आली होती. 20 नोव्हेंबरच्या रात्री पोलीस उप निरीक्षक कुणाल चव्हाण, पोलीस उप निरीक्षक लोकेश पवार, पोहेकॉ युवराज बंडु नाईक, पोहेकॉ प्रविण संगेले, पोहेकॉ नंदलाल परदेशी, पोना भुपेश वंजारी, पोना संतोष शिंदे, पोना नितीन आमोदकर, पोना गोवर्धन बोरसे, पोकॉ हिराजी देशमुख, पोकॉ निखील निकम, पोना नंदकुमार जगताप, पोना भगवान माळी, पोना मनोज पाटील, चापोना मनोहर पाटील आदींचे पथक पाटणा देवी जंगल परिसरात रवाना झाले होते.
दरम्यान चंदन वृक्षांच्या गाभ्याची चोरटी वाहतुक करणा-या सादिक नवीखा पठाण यास शिताफीने अटक करण्यात आली. मात्र त्याचे साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. त्याच्या कब्जातून 1 लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जंगलातील दहा ते बारा झाडे साथीदारांच्या मदतीने तोडल्याची कबुली त्याने दिली.
पोकॉ निखील निकम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला भा.द.वि. 379 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ प्रविण संगेले करत आहेत. या गुन्ह्यातील आरोपी वाढण्याची शक्यता असून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.