नाशिक : इगतपुरी शिवारातील गोंदे परिसरात तिन देशी बनावटीच्या पिस्टलसह चार जिवंत काडतुस बाळगणा-या दोघांना अटक करण्यात आली आहे. अनिल राजेंद्र सातपुते (रा. गोंदे दुमाला, ता. इगतपुरी) आणि अमोल सुकदेव भोर (रा. गोंदे दुमाला, ता. इगतपुरी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
22 नोव्हेंबरच्या रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वाडीव-हे हद्दीत गस्तीवर होते. दरम्यान काही संशयीत गोंदे एमआयडीसी परिसरात गावठी बनावटीच्या पिस्टलसह फिरत असून त्यांच्याकडून गुन्हा होण्याची शक्यता असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. हेमंत पाटील यांना समजली. त्या माहितीच्या आधारे गस्तीवर असलेल्या पथकातील अधिकारी व कर्मचा-यांनी शोध घेत संशयीत अनिल राजेंद्र सातपुते आणि अमोल सुकदेव भोर या दोघांना ताब्यात घेतले. दोघांच्या ताब्यातून देशी बनावटीची तिन पिस्टल व चार जिवंत काडतुसे मिळून आली. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. दोघांविरुद्ध शस्त्र अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
अनिल सातपुते हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापुर्वी खंडणीसह दरोडा, दंगा दुखापत असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, हे.कॉ. प्रविण मासुळे, पोना सचिन पिंगळ, विश्वनाथ काकड, मंगेश गोसावी आदींनी या पथकात सहभाग घेतला.