पुणे : चेकवर नकली सही असली भासवून मामा व भाच्याची तब्बल ७७ लाख ७० हजार ५४६ रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी आळंदी पोलिस स्टेशनला अविनाश सुधाकर थिटे (२९) रा. पिंपळेगुरव यांच्या फिर्यादीनुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल रमेश खारोळे व अर्चना अमोल खारोळे (च-होली खुर्द, पुणे) अशी दोघा संशयीतांची नावे आहेत. आरोपी यांनी फिर्यादीसह त्याचे मामा अशा दोघांशी संपर्क साधला. त्यांचा विश्वास संपादन केला. मे. खारोळे पाटील मँन्युफ्रँक्चरींग इंडस्ट्रीज ओपीसी प्रा.लि धानोरे, खेड या व स्टीलनेटिक इंडस्ट्रीज प्रा.लि कंपनी सुरु केली. यात फिर्यादी व त्यांचे मामा यांना समान भागीदार केले. तसेच विकसनासाठी त्यांच्याकडून ७७ लाख ७० हजार ५४६ रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगत ती गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
फिर्यादी यांनी रक्कम गुंतवली. त्यानंतर त्यांना आरोपींनी कुठलाही मोबदला (रिटर्न) दिला नाही. फिर्यादींनी आरोपीस विचारणा केली असता ‘तुम्हाला तुमची गुंतवलेली रक्कम परत देतो असे सांगण्यात आले. तुमची भागीदारी काढून घ्या’ असे सांगून प्रत्यक्षात फिर्यादींना पैसे परत दिले नाही. आरोपींनी विश्वासघात करत फसवणूक केली. फिर्यादी व आरोपी यांचे एका बँकेत जॉईंट खाते होते. त्या संबंधित बँकेंच्या चेकबुकवर खोटी सही करुन ती बँकेत खरी भासवली. आरोपीने ‘सिंगल पर्सन सिग्नेचर अथॉरिटी’ असलेल्या एका बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर केल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे. याप्रकरणी पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.