जळगाव : संगणकाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या बनावट कंपनीच्या खोट्या इलेक्ट्रॉनिक्स रेकॉर्डच्या भुलभुलैय्याला बळी पडून जळगावच्या वृद्ध व्यावसायिकाची सुमारे दिड कोटी रुपयात फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. या कंपनीच्या शेअर ट्रेडींगमधे आमचा भलामोठा फायदा झाल्याचे चौघांनी खोटे सांगून जळगावच्या व्यावसायिकाची सुमारे दिड कोटी रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरसोली रस्त्यावरील किरण, लेकसाईड रेसिडन्सी येथील रहिवासी वासुदेव महाजन यांनी या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. श्रीमती आयशा, विष्णू अग्रवाल, श्रीमती रिचा गुप्ता, अंगदसिंग उर्फ अरुण अशा त्रोटक नावाच्या व्यक्तींविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रोथ ट्रेड इंडीया (द मार्क ट्रेडस् ) ही संगणकावर तयार करण्यात आलेली कंपनी नाशिक व कोलकाता येथे अस्तित्वात असल्याचे दाखवत तिचे खोटे रेकॉर्ड तयार करण्यात आले होते. ते इंटरनेटच्या माध्यमातून लोकांना फसवण्यासाठी वापरात आणले गेले. या कंपनीच्या शेअर ट्रेडींगमधे भलामोठा फायदा होतो असे खोटे सांगून चौघांनी वासुदेव महाजन यांना पैसे गुंतवण्यासाठी उद्युक्त केले.
त्यांच्या आमिषाला बळी पडून वासुदेव महाजन यांनी 1 कोटी 44 लाख 26 हजार 116 रुपये गुंतवले. या व्यवहारात 7 लाख 68 हजार 79 हजार 518 रुपये नफा मिळाल्याचे भासवून ती रक्कम आपणास प्रत्यक्ष दिली जाईल असे चौघांनी वासुदेव महाजन यांना वेळोवेळी म्हटले. मात्र ती रक्कम त्यांना मिळाली नाही. या फसवणूकप्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. जयपाल हिरे करत आहेत.