जळगाव : सन 2021 मधे तरुणाने केलेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी साथीदाराच्या मदतीने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पहुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर सुभाष ढगे (रा. वाडी दरवाजा शेंदुर्णी ता. जामनेर) असे लोखंडी विळ्याच्या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या हल्ल्याप्रकरणी समाधान बळीराम पाटील (दहीहंडे) आणि संदीप रामदास काटोले (बारी) दोघे रा. शेंदुर्णी ता. जामनेर या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सन 2021 मधे सागर ढगे या तरुणाने समाधान बळीराम पाटील यास मारहाण केली होती. त्या वादातून संगनमताने समाधान आणि संदीप या दोघांनी 10 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास सागर यास गाठले. संदीपने सागरला पकडून ठेवले. दरम्यान आता सापडला आहे, तुला जीवंत ठेवणार नाही असे म्हणत समाधान याने सागरला शिवीगाळ करत लोखंडी विळ्याने त्याच्या मानेवर जीवे ठार करण्याच्या उद्देशाने वार केला. तो वार चुकवण्यासाठी सागरने डावा हात वर केला. त्यामुळे सागरच्या डाव्या दंडासह मनगटावर दुखापत झाली.
या घटनेप्रकरणी 11 डिसेंबर रोजी सागर ढगे याने पहुर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार भा.द.वि. 307, 504, 506, 427, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक दिलीप पाटील करत आहेत. यातील समाधान पाटील यास अटक करण्यात आली आहे. संदीप काटोले फरार असून त्याचा शोध सुरु आहे.