भाडेक-याच्या पत्नीकडे बघण्याचा राग ठसला मनात;- घरमालकाच्या मुलाची भोसकून हत्या केली एकांतात

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : सुरेश हरी शेट्टी हे पेंशनर गृहस्थ असून समाजकल्याण विभागाची सेवा बजावल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले आहेत. एकुलता मुलगा प्रमोद आणि तिन मुली अशा चौघांची लग्नकार्य त्यांनी पार पाडली. जळगावच्या मेहरुण शिवारातील जय भवानी नगर परिसरात राहणा-या सुरेश शेट्टी यांचा मुलगा प्रमोद हा उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात कंत्राटी स्वरुपावर सफाई कामगार म्हणून कामाला होता. सकाळी आठ ते चार अशी प्रमोदच्या कामकाजाची वेळ होती.

सुमारे 2 वर्षापुर्वी सुरेश शेट्टी यांनी त्यांच्या स्वमालकीच्या घराचा वरचा मजला सुनिल उर्फ साबीर नियामतखां तडवी यास भाड्याने राहण्यास दिला होता. सत्यराज नितीन गायकवाड हा सुनिलचा मित्र होता. तो सुनिल तडवी यास भेटण्यासाठी वरच्या मजल्यावर नेहमी येत असे. दरम्यान घरमालक सुरेश शेट्टी यांचा मुलगा प्रमोद याची सुनिलच्या पत्नीवर नजर पडत असे. त्यातून दोघे एकमेकांसोबत बोलत होते. आपल्या पत्नीसोबत घरमालकाचा मुलगा प्रमोदचे बोलणे सुनिल तडवी यास आवडत नव्हते. तु माझ्या पत्नीकडे का बघतो व तिच्यासोबत का बोलतो या कारणावरुन भाडेकरी सुनिल हा प्रमोदसोबत वाद घालत होता. हा वाद एके दिवशी एमआयडीसी पोलिस स्टेशनपर्यंत गेला. त्यामुळे घरमालक आणी भाडेकरी यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला होता.

Jaypal HIre PI

अखेर घरमालक सुरेश शेट्टी यांनी भाडेकरी सुनिल तडवी यास घर रिकामे करण्यास बजावले. बराच वाद झाल्यानंतर सुनिल तडवी याने ते घर रिकामे केले आणि पत्नीसह दुसरीकडे राहण्यास निघून गेला. तेव्हापासून सुनिल तडवी हा प्रमोद कडे खुनशी नजरेने बघत होता. भाडेकरी सुनिल तडवी यास त्याचा मित्र सत्यराज गायकवाड याची साथ होती. सुनिल आणि सत्यराज हे दोघे प्रमोद यास जीवे ठार मारण्याची धमकी देत असल्याचे म्हटले जात होते.

8 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी प्रमोद कामावरुन घरी परत आला. त्यावेळी सुनिल तडवी आणि सत्यराज गायकवाड या दोघांनी प्रमोदची वाट अडवली. साल्या तु माझ्या पत्नीचा पिच्छा सोडून दे नाहीतर तुला कायमचे संपवून टाकू अशी सुनिलने प्रमोदला धमकी दिल्याचे म्हटले जाते. आपल्याला सुनिल आणि सत्यराज या दोघांकडून झालेली शिवीगाळ आणि जीवे ठार करण्याची धमकी मिळाल्याचे प्रमोदने लागलीच घरी आल्यानंतर कथन केले. हा प्रकार बराच गंभीर झाल्याचे एकंदरीत दिसत होते.

10 डिसेंबर 2022 रोजी नेहमीप्रमाणे प्रमोद सकाळी सात वाजता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कामावर गेला. दुपारी नेहमीप्रमाणे त्याचे पत्नीसोबत फोनवर बोलणे झाले. त्यानंतर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तो घरी परत येणे अपेक्षीत होते. मात्र तसे झाले नाही. तो घरी आला नाही म्हणून घरातील सर्व सदस्य काळजीत पडले. त्याचा मोबाईल देखील लागत नव्हता. रात्रीचे अकरा वाजले तरी देखील प्रमोद घरी परत आला नाही. त्यामुळे सर्व जण जास्तच चिंता करु लागले. रात्रभर त्याचा सर्वांनी शोध घेतला मात्र सर्व प्रयत्न व्यर्थ गेले.

अखेर 11 डिसेंबर रोजी सकाळीच सुरेश शेट्टी यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठत प्रमोद बेपत्ता झाल्याची खबर नोंदवली. एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने त्याचा शोध सुरु केला. दरम्यान 12 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जळगाव तालुका पोलिस स्टेशनच्या कर्मचा-यांना प्रमोदचा मृतदेह निमखेडी शिवारात गिरणा नदी रेल्वे पुलाजवळ निर्जन जागी आढळून आला.

प्रमोदचा मृतदेह रक्तबंबाळ आणि छिन्नविच्छिन अवस्थेत आढळून आल्याने हा खूनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसत होते. दोन्ही हातांवर जागोजागी आणी पाठीवर देखील शस्त्राचे वार दिसून आल्याने परिसरात खळबळ माजली. जवळच त्याची मोटार सायकल लावलेली होती. प्रमोदचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह बघून त्याच्या वडीलांचा सुनिल आणी सत्यराज या दोघांवर संशय बळावला. दोघे बेपत्ता झाले होते.

mayat pramod shetty

आपल्या पत्नीसोबत प्रमोदचे अनैतिक संबंध असल्याचा सुनिल यास संशय होता. त्या संशयातून सुनिलने त्याचा साथीदार सत्यराज याच्या मदतीने प्रमोदची हत्या केल्याची सुरेश शेट्टी यांची खात्री झाली. त्यामुळे सुरेश शेट्टी यांनी या घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला दोघांविरुद्ध खूनाची फिर्याद दाखल केली. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 357/2022 भा.द.वि.302, 34 नुसार दाखल करण्यात आला.
दरम्यान एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला या गुन्ह्यातील संशयीत दोघे उमाळा जंगल शिवारात लपून बसल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे सत्यराज नितीन गायकवाड (रा. गणेश नगर, जळगाव) आणि सुनिल नियामतखाँ तडवी (रा. पंचशील नगर, फुकटपुरा, तांबापुरा, जळगाव) या दोघांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जंगलातून ताब्यात घेतले. या तपासकामी पो.नि. जयपाल हिरे यांचे तपास पथकाला योग्य ते मार्गदर्शन लाभले.

पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. सुधीर सावळे, किशोर पाटील, इम्रान सैय्यद, हेमंत कळकसर, छगन तायडे, सचिन पाटील, गणेश शिरसाळे, मुकेश पाटील, योगेश बारी, गोविंदा पाटील आदींनी दोघा संशयीतांना ताब्यात घेण्याकामी सहभाग घेतला. अटकेतील दोघांनी आपाला गुन्हा कबुल केला असून त्यांना पुढील तपासकामी जळगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here