जळगाव : दि. १३ डिसेंबर २०२२ रोजी भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टद्वारा जैन हिल्स, गांधीतीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात साहित्य-कला पुरस्कार २०२१ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी आदरणीय कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या ज्ञात-अज्ञात छटा मांडणाऱ्या ‘बहिणाई’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित, पद्मश्री डॉ.भालचंद्र नेमाडे, पद्मश्री कविवर्य ना.धों. महानोर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सेवादास श्री.दलूभाऊ जैन, श्री.अशोक जैन यांची उपस्थिती होती. तसेच सोबत पुरस्कार प्राप्त साहित्यिक श्रीमती संध्या नरे-पवार, श्री. वर्जेश सोलंकी, श्री. प्रवीण बांदेकर, श्री. प्रभाकर कोलते, सौ. ज्योती जैन, सौ. निशा जैन आणि डॉ. भावना जैन हे उपस्थित होते.
प्रस्तुत पुस्तकास डॉ. मीनाक्षी पाटील, सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य – संस्कृती मंडळ यांची प्रस्तावना तसेच जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री.अशोकभाऊ जैन यांचे मनोगत लाभले आहे. पुस्तकाचे संकलन आणि संपादन बहिणाबाई चौधरी ट्रस्टचे समन्वयक अशोक चौधरी यांनी केले असून त्यांना ज्ञानेश्वर शेंडे यांचे साहाय्य लाभले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि सजावट विजय जैन यांनी केली असून जळगावातील नामवंत प्रकाशन संस्था अथर्व पब्लिकेशन्सने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या व्यक्तिमत्त्वासंदर्भात तसेच त्यांच्या साहित्याविषयी वर्णन असलेल्या कविता आणि लेखांचा संग्रह संपादित करण्यात आला आहे.