पुणे : पुणे जिल्हयाच्या आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी-पिंगळवाडी येथील सुदाम विठ्ठल लांडे (60) या जेष्ठ नागरिकाची दोघा हल्लेखोरांनी लोखंडी हातोड्याने मारहाण करुन हत्या करण्यात आली. हत्येपुर्वी दोघांनी त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोकड लुटण्याचा प्रकार केला.या हत्येप्रकरणी दोघांविरोधात घोडेगांव पोलीस स्टेशनला खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील एकाला अटक करण्यात आली आहे. दुसरा आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला असून पोलिस त्याच्या मागावर आहे.
हत्या झालेले सुदाम विठ्ठल लांडे यांची मिसींग घोडेगांव पोलीस स्टेशनला दाखल होती. त्यानंतर त्यांचे शव संशयास्पद अवस्थेत लांडेवाडीच्या अंगणवाडीनजीक कॅनॉल परिसरातील जंगलात 22 जून रोजी आढळले होते. हे घटनास्थळ मंचर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे. हा संशयास्पद मृत्यू असल्याचे आढळून आल्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी तपास सुरु केला.
पोलिस तपासात डिंबा उजवे कॅनॉल नजिकच्या जंगलात विकी सुरेश एरंडे व ऋषिकेश रमेश मोरे (रा.नारोडी ) या दोघांनी सुदाम विठ्ठल लांडे यांना मोटार सायकलवर बळजबरीने नेवून त्यांना लोखंडी हातोड्याने मारहाण करुन त्यांचा खून केल्याचे उघड झाले. त्यांच्या अंगावरील दोन तोळे वजनाची सोन्याची साखळी व 3 ते 4 हजार रुपये रोख रक्कम काढून घेण्यात आल्याचे आढळून आले. त्यांचा मृतदेह कॅनॉलच्या पाण्यात टाकून दिल्याचे देखील पोलिस तपासात उघड झाले आहे. हा गुन्हा मंचर पोलीस स्टेशनकडून पुढील तपासासाठी घोडेगांव पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे.
ऋषिकेश रमेश मोरे या संशयीतास घोडेगाव पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.