जळगाव : तेरा महिन्यात रक्कम दुप्पट करुन देण्याच्या आमिषाला बळी पडून 31 लाख 50 हजार रुपयात व्यावसायीकाची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी औरंगाबाद येथील सहा जणांविरुद्ध जळगाव जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आसोदा येथील महेश तुकाराम भोळे यांचे जळगाव शहरातील विसनजी नगर भागात फ्लॉवर पॉईंट नावाचे दुकान असून त्यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
अरुण नागोराव अंभोरे यांनी शेंद्रा एमआयडीसी औरंगाबाद येथे इंडोपर्ल या नावाने शिंपल्यापासून मोती तयार करण्याची कंपनी स्थापन केली. या कंपनीत त्यांनी पत्नी सौ. मंदा अरुण अंभोरे, मुलगी दिपाली अंभोरे, राहुल शेळके, विनोद बाहेकर, आकाश आठल्ये अशा सर्वांना या कंपनीत संचालक केले.
अवघ्या तेरा महिन्यात दुप्पट रक्कम करुन दिली जाईल असे बोलून त्यांनी महेश भोळे यांना मोहात पाडले. तेरा महिन्यात 63 लाख रुपये मिळतील या मोहाला बळी पडून महेश भोळे यांनी या सर्वांना 31 लाख 50 हजार रुपये दिले. स्वाक्षरी केलेले कोरे चेक महेश भोळे यांना देत कोणताही करारनामा करण्यात आला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महेश भोळे यांनी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला याप्रकरणी फिर्याद दाखल केली. सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार पुढील तपास करत आहेत.