जळगाव : बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या राग मनात धरुन आणि सुरु असलेल्या विवादास्पद परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर भावाने तिच्या सास-याची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे या गावी शुक्रवारी दुपारी घडली. घटनेनंतर पसार झालेल्या तरुणाविरुद्ध मेहुणबारे पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन राजेंद्र चव्हाण असे हत्या करणा-या व गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. दगडू वामन खैरनार (रा. मेहुणबारे ह.मु.तिरपोळे ता.चाळीसगाव) असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे.
दगडू खैरनार यांचा मुलगा जगदीश खैरनार या तरुणाने गेल्या तीन महिन्यांपूर्वी मेहुणबारे येथील तरुणीला पळवून नेत प्रेमविवाह केला होता. या घटनेचा तरुणीचा भाऊ सचिन राजेंद्र चव्हाण याच्या मनात राग खदखदत होता. दोन्ही परिवारांमध्ये भांडणे सुरु होती. मुलाच्या परिवाराला धमकी देखील देण्यात आली होती असे म्हटले जाते.
प्रेमविवाह करणा-या मुलाचे वडील दगडू खैरनार हे शुक्रवारी दुपारी एक वाजता तिरपोळे येथून मेहुणबारे येथे बस स्थानकाकडे पायी येत होते. याच वेळी संधी साधत राग मनात धरलेल्या तरुणीचा भाऊ सचिन चव्हाण याने मोटारसायकलवर येत हातातील धारदार शस्त्राने त्यांच्या मानेवर वार केला. हातातील शस्त्र जागेवरच टाकून त्याने घटनास्थळावरुन पलायन केले.
घटनेचे वृत्त समजताच घटनास्थळावर दगडू खैरनार यांचे नातेवाईक दाखल झाले. घटनास्थळावर दगडू खैरनार हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. नातेवाइकांनी त्यांना तातडीने मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले. दीपक गढरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सचिन चव्हाण याच्याविरुद्ध मेहुणबारे पोलिस स्टेशनला हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.