जळगाव : महाविद्यालयीन विद्यार्थ्याकडून साडेतीन हजार रुपये जबरीने हिसकावून वेळोवेळी चाकूच्या धाकावर धमकी देत पैशांची मागणी करणा-या तरुणास जळगाव एलसीबी पथकाने अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनिल प्रकाश खोंडे (रा. इंद्रप्रस्थ नगर जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
जयदीप राजेंद्र कच्छवा हा धुळे येथील तरुण नुतन मराठा महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. शैक्षणीक कामकाजाच्या निमीत्ताने तो गांधी परिसरातील रोटे हॉस्पीटल नजीक भाड्याच्या खोलीत राहतो. 19 डिसेंबर रोजी सुनिल खोंडे या तरुणाने जयदीप कच्छवा याच्याकडून चाकूच्या धाकावर जबरीने साडेतीन हजार रुपये हिसकावून घेतले होते. तुला जळगाव शहरात रहायचे असल्यास मला पैसे द्यावे लागतील असे सुनिल खोंडे याने जयदीप कच्छवा यास वेळोवेळी फोन करुन धमकावले होते. वेळोवेळी सुनिलकडून जयदीप यास पैशांची मागणी सुरुच होती.
याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरु होता. पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार रवी नरवाडे, पोहेकॉ संजय हिवरकर, पोहेकॉ राजेश मेंढे, पोना संतोष मायकल, पोकॉ किशोर मोरे, पोकॉ ईश्वर पाटील यांच्या पथकाने सुनिल खोंडे याचा ठावठिकाणा शोधून काढत त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या समक्ष हजर करण्यात आले.
विद्यार्थी जयदीप राजेद्रं कच्छवा याचेकडुन खंडणी मागण्याची सुनिल खोंडे याने कबुली दिली. खंडणी बहाद्दर सुनिल प्रकाश खोंडे याच्याविरुध्द यापुर्वी जळगांव शहर पोलिस स्टेशनला गु.र.न. 108/2019 भा.द.वि. कलम 307 (प्राणघातक हल्ला), ३२६, ४५२ असा गुन्हा दाखल आहे. पुढील तपासकामी त्याला जिल्हापेठ पोलिस स्टेशनला हजर करण्यात आले आहे.