सागर आणि गोपालच्या वादात आकाशची धडकन झाली बंद

जळगाव : दोन तरुणांच्या जुन्या वादात एकाची हत्या झाल्याचा प्रकार 20 डिसेंबर रोजी जळगाव शहरातील जुने बस स्थानक परिसरात घडला. या घटनेत दोघे जखमी तर एक ठार झाला आहे. हत्या झालेल्या तरुणाचा भाऊ आणि आणखी एक जण जखमी झाला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर आनंदा सपकाळे आणि गोपाल उर्फ अण्णा कैलास सैंदाणे या दोघा तरुणांमधे जुना वाद होता.

20 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सागर सुरेश सपकाळे आणि त्याचा भाऊ आकाश उर्फ धडकन सुरेश सपकाळे, सागर आनंदा सपकाळे, विशाल लालचंद हारदे, शुभम रविंद्र इंगळे, केशव विलास इंगळे, सनी अशोक इंगळे (सर्व रा. जुने जळगाव रथ गल्ली जळगाव) असे सर्व जण जुने बस स्टॅंडच्या पाठीमागे अंडाभुर्जीच्या गाडीवर अंडापाव खाण्याचा आनंद लुटत होते. त्याचवेळी अ‍ॅक्टिव्हा गाडीने गोपाल उर्फ अण्णा कैलास सैंदाणे त्याठिकाणी आला. त्याच्या पाठोपाठ त्याचे मित्र न-या  उर्फ भद्रा आणि विजु असे दोघे आले. सागर आनंदा सपकाळे याला तुमच्यासोबत का ठेवता? असा  प्रश्न  गोपालने अंडापावच्या गाडीजवळ उभ्या असलेल्या सर्वांना केला. सर्व जण त्याला समजावू लागले.

संतापलेल्या गोपाळने अ‍ॅक्टीव्हाच्या डीक्कीतून चाकू बाहेर काढत समोर आलेल्या आकाशवर वार सुरु केले. न-या उर्फ भद्रा आणि विजू याने इतरांना पकडून ठेवले. गोपाळने सागर सुरेश सपकाळे याच्या पाठीवर आणि  तळहातावर वार  केले. त्यात तो जखमी झाल्याने घाबरुन पळू  लागला. पळता पळता तो नवजीवन सुपर शॉपनजीक बेशुद्ध होत पडला. त्याला कुणीतरी खासगी दवाखान्यात दाखल केले. खासगी दवाखान्यात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान आकाश उर्फ धडकन सुरेश सपकाळे याच्यावर गोपाल सैंदाणे याने चाकूचे वार  केले. त्यात तो मयत झाला. या  हल्ल्यात आकाशचा भाऊ सागर सुरेश सपकाळे आणि त्याचा मित्र सागर आनंदा सपकाळे हे दोघे जखमी झाले.

या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उप अधिक्षक संदीप गावीत, एलसीबीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे, गणेश देशमुख, यांच्यासह जिल्हापेठ, शहर आणि  एलसीबी कर्मचा-यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here