जळगाव : जळगाव शहरातील जुने बस स्थानक परिसरात झालेल्या तरुणाच्या खूनानागे नेमका कोणता वाद होता याबाबत चर्चा सुरु झाली आहे. अटकेतील संशयीत आरोपी हत्येच्या मुळ कारणाविषयी उघड उघड बोलत नसले तरी जनतेत या हत्येच्या कारणाची चर्चा सुरु आहे.
20 डिसेंबर 2022 रोजी आकाश उर्फ धडकन सुरेश सपकाळे या तरुणाची चाकूचे वार करुन हत्या झाली. सागर उर्फ बिडी सुरेश सपकाळे आणि सागर उर्फ झंप-या आनंदा सपकाळे अशी जखमींची नावे आहेत. सागर सुरेश सपकाळे या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार गोपाल उर्फ अण्णा कैलास सैंदाणे, भु-या उर्फ भद्रा सोनवणे आणि विजू अशा तिघांविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गु.र.न. 380/22 भा.द.वि. 302, 307 आणि 34 प्रमाणे हा गुन्हा दाखल आहे.
या हत्येच्या घटनेतील दोन्ही पक्षाकडील दोघे तरुण गुन्हेगारी पार्श्वभुमीचे असल्याचे दिसून आले आहे. मयत आकाश आणि अटकेतील गोपाल सैंदाणे या तरुणांविरुद्ध विविध पोलिस स्टेशनला विविध गुन्हे दाखल आहेत. मयत आकाश उर्फ धडकन याच्या विरुद्ध शनीपेठ, यावल, धरणगाव, एरंडोल अशा चार पोलिस स्टेशनला विविध गुन्हे दाखल असून तो पोलिसांच्या अभिलेख्यावरील गुन्हेगार होता. अटकेतील गोपाल उर्फ अण्णा कैलास सैंदाणे याच्याविरुद्ध शनीपेठ पोलिस स्टेशनला आतापर्यंत पाच व जळगाव शहरला नव्याने दाखल झालेला खूनाचा एक असे एकुण सहा गुन्हे दाखल आहेत.