जळगाव : पाच लाख रुपये रोखीसह दागिन्यांच्या चोरीप्रकरणी मेहुणबारे पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव येथील दोघा बंद घरांमधे मिळून एकुण 5 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी 22 ते 24 डिसेंबरच्या कालावधीत चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव येथील विजय केशवराव चव्हाण आणि नंदलाल नामदेव शेवाळे या दोघांच्या बंद घरातून चोरीचा हा प्रकार झाला आहे. या घटनेत विजय चव्हाण यांच्या बंद घरातून 20 हजार रुपये किमतीच्या प्रत्येकी अर्धा ग्रॅम वजनाच्या एकुण दहा अंगठ्या, 9 हजार रुपये किमतीचा 2 ग्रॅम वजनाचा सोन्याचा शिक्का, 1 हजार रुपये किमतीचे दोन चांदीचे देव, 10 हजार रुपये किमतीच्या 25 साड्या आणि नंदलाल शेवाळे यांच्या घरातून 5 लाख रुपये रोख असा मुद्देमाल चोरी झाला आहे.
या घटनेप्रकरणी मेहुणबारे पोलिस स्टेशनला गु.र.न. 280/22 भा.द.वि. 454, 457,380 नुसार घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक विष्णु आव्हाड व त्यांचे सहकारी पुढील तपास करत आहेत.