नाशिक : गंगापूर रस्त्यावरील निम्स नावाच्या खासगी रुग्णालयात नोकरी करणाऱ्या वॉर्डबॉयसह तिच्या मैत्रिणीला कामात हलगर्जीपणा केल्यामुळे त्या रुग्णालयातील महिला डॉक्टरने रागवले. मैत्रीणीला रागावल्याचा राग मनात धरत संशयित आरोपी अनिकेत डोंगरे (रा. संतकबीरनगर झोपडपट्टी) याने महिला डॉ. सोनल दराडे यांच्यावर वैद्यकीय उपकरणामधील कात्रीने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत महिला डॉ. दराडे या गंभीर जखमी झाल्या. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी डोंगरे यास अटक केली आहे.
रविवार दि. 25 डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गंगापूर रस्त्यावरील निम्स या खासगी रुग्णालयात डॉ. सोनल दराडे यांच्यावर डोंगरे याने कात्रीने वार करून जखमी केले. त्यांच्या मानेच्या व पोटाच्या उजव्या बाजूस कात्री मारल्यामुळे दुखापत झाली आहे. या रुग्णालयात काम करणाऱ्या मैत्रिणीवर तसेच दुपारच्या सुमारास संशयित डोंगरे याच्यावर कामात हलगर्जीपणा करत असल्याच्या कारणावरून दराडे या काहीशा रागावल्या होत्या.
या प्राणघातक हल्ल्यात त्या गंभीररीत्या जखमी झालेल्या डॉ. सोनल दराडे यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जात आहे. सुकदेव नामदेव आव्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित अनिकेत डोंगरे याच्याविरुद्ध जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर डोंगरे यास पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल पवार अधिक तपास करत आहेत.






