गांधी विचारांचे महत्त्व कालातीत – अशोक जैन

जळगाव, दि. 1 प्रतिनिधी – ‘देशाने आजादी का अमृत महोत्सव साजरा केला. या स्वातंत्र्याच्या 75 वर्ष आणि त्यापूर्वीची 75 वर्ष अशी मिळून 150 वर्षापूर्वीच्या महात्मा गांधीजींच्या विचारांची, संस्कारांची आजही गरज आहे. महात्मा गांधीजींच्या विचारांचे महत्त्व आजही, भविष्यातही महत्त्वपूर्ण असून ते जगमान्य आणि कालातीत आहेत. संपूर्ण जगाला गांधीजींना सांगितलेल्या मार्गावर चालण्याशिवाय पर्याय नाही. महात्मा गांधीजींच्या विश्वस्त भावनेतून समाजाकडे बघून गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित नॅशनल गांधियन लिडरशीप कॅम्पमधील सहभागी अभ्यासकांनी कार्य करावे’; असे मार्गदर्शन जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अशोक जैन यांनी केले.

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे गांधी तीर्थ येथे आयोजीत नॅशनल गांधीयन लिडरशीप कॅम्पचा समारोपाप्रसंगी सहभागी विद्यार्थी व अभ्यासकांशी प्रश्नोत्तर स्वरूपात साधलेल्या सुसंवादावेळी अशोक जैन बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या रिसर्च डीन प्रो. गीता धर्मपाल उपस्थितीत होते. सुसंवादाच्या सुरूवातीला अशोक जैन यांच्याहस्ते महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. यानंतर पी. जी. डिप्लोमाचे विद्यार्थी शिवाजी कोकणे, अमनकुमार वर्मा, जयश्री देशमुख यांच्याहस्ते अशोक जैन, गीता धर्मपाल, अब्दुलभाई यांचा सुतीहाराने सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नॅशनल गांधीयन लिडरशीप कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 

जम्मू काश्मीर, बिहार, तेलंगणा, झारखंड, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल यासह संपूर्ण भारतातून व नेपाळ या देशातून 56 विद्यार्थ्यांनी नॅशनल गांधियन लिडरशीप कॅम्पमध्ये सहभाग घेतला. दि. 21 डिसेंबर ते 1 जानेवारी या 12 दिवसातील आलेले अनुभव विद्यार्थ्यांनी मांडले. त्यात बिहारमधील कुमार हर्षवर्धन भारद्वाज याने, बारा दिवसांचा प्रवास थांबला नसून राष्ट्रनिर्माणाच्या कार्याच्या प्रवासाची सुरवात झाल्याचे सांगितले. मोहनदास ते महात्मा ही देशप्रेमाची ऊर्जा प्रत्येकाच्या मनात जागृत करण्यासाठी हा कॅम्प महत्त्वपूर्ण ठरला असून स्वत:मध्ये बदल केला तर देशात नक्कीच बदल करता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तर रितीका राजपूत हिने आत्मबलाची साधना हेच अंतिम सत्य आहे ते या कॅम्पमध्ये पाहता आले. पर्यावरण जीवनशैलीतून ‘नर का नारायण’ होता येते याची दिशा कॅम्पमध्ये मिळाली. महात्मा गांधीजींचे विचार सार्थकी ठरविण्यासाठी प्रत्येकाने करून पाहिले तरच साध्य होईल अशी आशा व्यक्त केली. कुठल्याही समस्येच्या निराकरण करण्यासाठी वेगळी दृष्टी याठिकाणी मिळाली असून त्यादृष्टीने समाजात प्रयत्न केले तर अहिंसात्मक बदल घडवून आणता येतील असा विश्वास राजपूत हिने व्यक्त केला. यासह तेलंगणाची प्रणवती, उत्तरप्रदेशमधील राहूल सिंग यांनीही नॅशनल गांधीयन लिडरशीप कॅम्प मधील महात्मा गांधीजींच्या विचारांचे संचित याविषयी मनोगत व्यक्त केले.

गांधी लिडरशिप कॅम्प आयोजनाबाबत विद्यार्थ्यांकडून प्रश्नाला उत्तर देताना अशोक जैन म्हणाले की, जैन उद्योग समूहाचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्यावर आई गौराई, वडिल हिरालाल, पंडीत जवाहरलाल नेहरू, टाटा व महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव होता. यावर प्रत्यक्ष काम करताना कांताईंची त्यांना भरभक्कम साथ मिळाली. जैन उद्योग समूहाची सर्व उत्पादने ही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी असून गांधीजींच्या विश्वस्त या संस्कारातूनच समाजाकडे पाहिले जाते. श्रद्धेय भवरलालजी जैन म्हणायचे, ‘मी पुर्ण गांधीयन होऊ शकलो नाही, मात्र येणाऱ्या पिढीला गांधीजींचे विचार समजावे’ यासाठीच गांधी तीर्थसह गांधी लिडरशीप कॅम्पचे आयोजन आहे. युवापिढीवर गांधीजींचा प्रभाव कसा या प्रश्नांवर कुटुंबातील उदाहरण अशोक जैन यांनी दिले. श्रद्धेय भवरलालजी जैन हे नातवांसोबतच जास्त वेळ घालवत त्यामुळे त्यांचा नातवांवर प्रभाव पडला यातून गांधी विचारांचा संस्कार त्यांच्यावर झाल्याचे अशोक जैन यांनी सांगते. गांधी विचारातून समाज घडविण्यासाठी कार्य करण्याची ईच्छा असेल तर सहकार्य करण्याचे आश्वासनही विद्यार्थ्यांना त्यांनी यावेळी दिले. प्रास्ताविक कु. रिती शहा यांनी केले. सूत्रसंचालन नितीन चोपडा यांनी केले. आभार डॉ. अश्विन झाला यांनी मानले. इसलिए राह संघर्ष की हम चुने… भारत के नौजवान हम इस देश की शान.. या गीतांनी नॅशनल लिडरशीप कॅम्पचा समारोप झाला.

नेतृत्वगुणांसह स्वावलंबनाची दिशा देणारा कॅम्प – नॅशनल गांधीयन लिडरशीप कॅम्पमध्ये गुजराथ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार, कल्याण अक्कीपेड्डी,  तृप्ती पारिख, दिलीप कुलकर्णी, देवाजी तोफा, रमेश पटेल, डॉ उल्हास जाजू, डॉ. अश्विन झाला यांसारखे विविध वक्तांनी मार्गदर्शन केले. ग्रामस्वराजावरासाठी स्वावलंबी समाज, नेतृत्वगुण आणि पॅनेल चर्चा, मानवतेसाठी योगदान, शांतता खेळ अशा विविध पद्धती वापरून त्यांची निर्मिती करणे यासाठी अभ्यासपूर्ण भाषणे झालीत. सहभागींनी आपआपल्या राज्याचे प्रादेशिक सादरीकरण केले. जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड कंपनीच्या सेवाभावी उपक्रमांनाही भेट सहभागी विद्यार्थी व अभ्यासकांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here