जळगाव : पारोळा तालुक्यातील शिवरे येथील महिलांना आपण बॅंकेचे अधिकारी असल्याचे सांगून कर्ज मंजूर करुन देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्यास पारोळा पोलिसांनी नरडाणा ता. शिंदखेडा येथून अटक केली आहे.
बचत गटास चार लाख रुपयांचे कर्ज देतो असे सांगत राजू शर्मा असे खोटे नाव सांगत शिवरे येथील महिलांकडून अटकेतील इसमाने दहा महिलांचे आधारकार्ड, मतदान कार्ड, बॅंकेचे पासबुक, प्रत्येक महिलेकडून प्रत्येकी तिनशे रुपये व इतर दोघा महिलांकडून प्रत्येकी 1950 आणि 1000 असे एकुण 5950 रुपये घेत पलायन केले होते.
पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या पथकातील सहकारी पोलिस नाईक संदीप सातपुते, पो कॉ किशोर भोई, पो कॉ अभिजित पाटील, पो कॉ आशिष गायकवाड, पो कॉ राहुल पाटील,पो कॉ राहुल कोळी, पो कॉ हेमचंद्र साबे आदींनी त्याला नरडाना ता शिंदखेडा येथून ताब्यात घेतले. याप्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला तोतयेगिरी करुन फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेतील आरोपीस तिन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस नाईक प्रदीप पाटील पुढील तपास करत आहेत.







