विजय जैन यांच्या “प्लास्टिक प्रदूषण” विषयावरील पोस्टर ला राज्य शासनाचा पुरस्कार!

मुंबई दि.10 प्रतिनिधी –  जैन इरिगेशनच्या कला विभागातील चित्रकार श्री. विजय जैन यांच्या प्लास्टिक प्रदूषण विषयाचे गांभीर्य अधोरेखित करत, घराबाहेर पडताना आपली कापडी पिशवी सोबत बाळगण्याची आठवण करून देणाऱ्या लक्षवेधी पोस्टर रचनेला महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाच्या ६२ व्या वार्षिक प्रदर्शनात ५० ००० (रुपये पन्नास हजार) चे पारितोषिक प्राप्त झाले आहे.

प्रधान सचिव श्री विकासचंद्र रस्तोगी, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, प्रा प्रमोद रामटेके, अमूर्त चित्रकार, नागपूर, श्री. राजीव मिश्रा, कला संचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे दि १० जानेवारी २०२३ रोजी सायं ५.३० वा. प्रसिध्द छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे यांच्या हस्ते जैन यांना गौरविण्यात आले. उपयोजित कलेच्या सदर पोस्टरसह विजय जैन यांच्या रेखा व रंगकला विभागात “रंगलीपी” ही जलरंग चित्र मालिका देखील या वार्षिक कला प्रदर्शनाचा भाग आहे. सदर प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत ११ ते १६ दरम्यान सर्वांसाठी खुले असणार आहे.

जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन यांनी प्लास्टिक कचऱ्यासारख्या ज्वलंत सामाजिक विषयाला साध्या सोप्या रुपात मांडल्याचे सांगत श्री विजय जैन उपयोजित कलेबरोबर रेखा व रंगकलेमध्ये देखील आपले योगदान सातत्याने देत असल्याबद्दल यांचे कौतुक केले आहे. नुकताच “पुरुषी अहंकार” या विषयावरच्या त्यांच्या पोस्टरला मुंबईच्या “डूडल सोशल ॲड फेस्ट” या राष्ट्रीय स्पर्धत नामांकन मिळाले आहे. सदर स्पर्धेचे ते २०१७ चे विजेते आहेत. विजय जैन यांच्या “स्त्री शिक्षणा”च्या पोस्टर ला उत्तर प्रदेश ललित कला अकादमी चा पुरस्कार मिळाला आहे. स्वच्छ भारत, प्रौढ शिक्षण, झाडं वाचवा, बाल कामगार, सकस आहार- विद्यार्थी, सोशल मीडिया वापर: एक जबाबदारी आणि कोरोना काळातील मास्क वापरासाठी उद्युक्त करणारी सोशल मीडिया मालिका अशा सामाजिक विषयाला धरून त्यांनी अतिशय कल्पक आणि प्रबोधनात्मक पोस्टर रचना साकारल्या आहेत. त्यांच्या या कामाचे राज्य व राष्ट्रीय स्तरावर सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here