जळगाव (ललीत खरे याजकडून): एरंडोल येथील प्रसिद्ध व्यापारी तथा ऑईल मिल चालकास लाखो रुपयांची खंडणी मागणा-या दोघा पत्रकारांसह एकुण आठ जणांना एरंडोल पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून अटक केली आहे. यात तिन महिलांचा समावेश असून दोघी अल्पवयीन असल्याची पोलिसांना शंका आहे. त्यामुळे तिची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. या खळबळजनक घटनेमुळे एरंडोल तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
एरंडोल येथील प्रसिद्ध श्री बालाजी ऑईल मिल चालवणारे आनंद अनिल काबरे यांचे वडील अनिल गणपती काबरे यांना एक पुरुष आणि एक महिला अशा दोघांनी मिळून त्यांची सरकारी कार्यालयात तक्रार करण्यात येईल अशी धमकी दिली होती. त्यांच्याकडून सात ते आठ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. या दोघांविरुद्ध एरंडोल पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 13/2023 भा.द.वि.384, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील पुरुष व महिला 16 जानेवारी रोजी खंडणी मागण्यासाठी श्री बालाजी ऑईल मिल मधे येणार असल्याचे काबरे यांनी एरंडोल पोलिसांना कळवले होते. त्यानुसार श्री. बालाजी ऑईल मिल याठिकाणी पंचांसह पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सपोनि गणेश अहिरे, पोलिस उप निरीक्षक शरद बागुल, पोहेकॉ अनिल पाटील, पोना मिलिंद कुमावत, पोना संदीप पाटील, पोना जुबेर खाटीक, महिला पोना ममता तडवी, होमगार्ड पीओ दिनेश पाटील आदींसह श्री. बालाजी ऑईल मिल परिसरात सापळा रचण्यात आला.
दोन महिला व दोन इसम हे खंडणी मागण्याकामी ऑईल मिलमधे आले. एक महिला व तीन पुरुष मिल कंपाऊंडच्या बाहेर थांबले. ऑईल मिलमध्ये आलेल्या महिलेने अनिल गणपती काबरे यांचेकडून एक लाख रुपये खंडणी घेतली. त्याचवेळी पंचासमक्ष दबा धरुन बसलेल्या पोलिस पथकाने त्यांना लागलीच रंगेहाथ छापा टाकुन ताब्यात घेतले. छाप्याची चाहुल लागताच ऑईल मिलच्या बाहेर उभे असलेली एक महिला व तीन पुरुष हे दोन मोटर सायकलीने म्हसावद नाका मार्गे जळगावच्या दिशेने पळून जाऊ लागले. सपोनि गणेश अहिरे, पोना जुबेर खाटीक, महिला पोना ममता तडवी होमगार्ड पीओ दिनेश पाटील आदींनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना महामार्ग पोलीस केंद्र पाळधी व पाळधी दूरक्षेत्र येथील पोलीस अंमलदार आदींच्या मदतीने पकडून ताब्यात घेतले.
साक्षी राजु तायडे (रा. कुलकर्णी प्लॉट धम्मनगर, भुसावळ), मोहीनी विनोद लोखंडे (रा. पिंपरी पुणे, ह.मु. रा. कुलकर्णी प्लॉट धम्मनगर, भुसावळ), शशिकांत कैलास सोनवणे (धंदा- किराणा दुकान, रा. प्लॉट नं. 228, द्वारका नगर, भुसावळ), सिद्धार्थ सुनिल सोनवणे (विद्यार्थी) (रा. झेडटीएस रोड, ताप्ती क्लब, भुसावळ), रुपाली राजु तायडे, रा. कुलकर्णी प्लॉट धम्मनगर, भुसावळ, मिलिंद प्रकाश बोदडे, धंदा- पत्रकार, रा. तळणी, ता. मोताळा, जिल्हा बुलढाणा, गजानन आनंदा बोदडे (रा. कुलकर्णी प्लॉट धम्मनगर, भुसावळ), आकाश सुरेश बोदडे (धंदा- चालक, रा. तळणी, ता. मोताळा, जिल्हा बुलढाणा) अशी पोलिसांच्या ताब्यातील आठ जणांची नावे आहेत.
मिलिंद प्रकाश बोदडे (पत्रकार – न्युज 24 महाराष्ट्र) रा. तळणी, ता. मोताळा, जिल्हा बुलढाणा याने यापूर्वी वेळोवेळी ऑईल मिल बाबत कारवाई करण्याबाबत वेगवेगळ्या नावाने सरकारी कार्यालयात अर्ज करुन अनिल गणपती काबरे यांच्याकडून साठ ते सत्तर हजार रुपयांची खंडणी उकळली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या खंडणीबाजांकडून खंडणीचे एक लाख रुपये रोख, 8 मोबाईल, 2 मोटर सायकल, 1 डिझायर कार असा एकुण 10 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील साक्षी राजू तायडे व मोहीनी लोखंडे या दोघींच्या वयाची व त्या अल्पवयीन असल्याची पोलिसांना शंका आल्याने त्यांची बालसुधार गृह जळगांव येथे रवानगी करण्यात आली आहे. पो.नि. ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि गणेश अहिरे हे करत आहेत.