नाशिक : सोशल मीडियावर धादारदार तलवार, गुप्तीसोबत विविध रिल्स तयार करून अपलोड करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून संशयितांकडून पोलिसांनी स्टीलच्या धारदार तलवारीसह लोखंडी गुप्ती जप्त केली आहे.
नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने शुक्रवारी (दि.१८) कारवाई करीत इंस्टाग्राम या सोशल साईटवर तलवार व गुप्तीसारख्या घातक धारदार शस्त्रांसह रिल्स बनवून अपलोड केल्याने दोघांना अटक केली आहे, यात संशयित फयाज नईम शेख (१९, रा, भारतनगर) याचा शोध घेऊन त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या ताब्यातून एक स्टीलची धारदार तलवार हस्तगत केली.
पोलिसांनी चौकशी केली असता त्याने ही तलवार त्याचा मित्र सचिन शरद इंगोले (२८, रा. भारतनगर) याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी इंगोले याचीही चौकशी करून त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एक धारदार लोखंडी गुप्ती हस्तगत करण्यात आली आहे.
पोलिस अंमलदार मुक्तार शेख यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, नझीमखान पठाण, शरद सोनवणे पोलिस नाईक प्रशांत मरकड, विशाल देवरे, महेश साळुंके व पोलिस अमलदार मुख्तार शेख वडाळा भागातील भारतनगर परिसरात ही कारवाई दोनही संशयितांना अटक केली आहे.