अकोला : व्हॉट्सअॅपसह ई- मेलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जडीबुटीचा व्यवसाय सुरू करा, अशा भूलथापा देत चंदिगड येथील एका व्यापाऱ्यासह नागालँड येथील चौघांनी अकोल्यातील एका उद्योजकाला 50 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अकोला जुने शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोला येथील उद्योजक विवेक रामराव पारसकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर 2022 या कालावधीत आरोपी विनोद कुमार रामदेव मेहता रा. रामदेव मेहता हाउस नंबर 305 चंदीगड, रेजिना इमर्सन डॅनी अलास्का, अॅडम बोल, मोनिका शर्मा रा. नागालँड यांनी जडीबुटीच्या व्यवसायाबद्दल व्हॉट्सअॅप आणि ई-मेलद्वारे त्यांना माहिती दिली.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जडीबुटीचा व्यवसाय सुरु करण्याचे त्यांना आश्वासने देण्यात आले. नफ्याचे आमिष दाखवून दिलेल्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार विवेक पारसकर यांनी शर्मा इंटरप्राईजेसचा खातेधारक विनोद रामकुमार मेहता याच्यासह मोबाइलद्वारे संपर्कामध्ये आलेले लोकांच्या वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये एकूण 49 लाख 90 हजार रुपये जमा केले. त्यानंतर आरोपींनी पारसकर यांच्यासोबत संपर्क आणि प्रतिसाद बंद केला. त्यामुळे आपली फसवणून झाल्याचे लक्षात आल्यानंतर पारसकर यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास वर्ग करण्यात आला आहे.