नाशिक : मुखेड ता. येवला येथील महीलेचा खून करुन तिचे दागीने पळवणा-या आरोपीस नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. 21 जानेवारी 2023 रोजी येवला तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील मुखेड या गावी कॅनॉल लगत असलेल्या शेतात काम करणा-या महिलेचा उपरण्याने गळा आवळून, जमीनीवर डोके आपटून हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर तिच्या अंगावरील दागिने जबरीने चोरुन नेण्यात आले होते. महिलेच्या मुलाने याप्रकरणी येवला तालुका पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार गु.र.न. 26/23 भा.द.वि. 302, 397, 394 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी घटनास्थळी भेट देत गुन्हा उघडकीस आणण्याकामी सुचना दिल्या होत्या. घटनास्थळी मिळून आलेले भौतिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शीने पाहिलेल्या आरोपीचे वर्णन तपासण्याकामी पोलीसांनी अहोरात्र मेहनत घेत संशयीत निलेश भगवान गिते (रा. महालखेडा, ता. येवला) यास ताब्यात घेतले. अधिक चौकशीअंती त्याने आपला गुन्हा कबुल केला.
आरोपी निलेश भगवान गिते याच्याविरूध्द येवला तालुका पोलीस स्टेशनला खून व चोरी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. घटनेच्या दिवशी मुखेड गावचा आठवडे बाजार असल्याने निलेश गिते हा आठवडे बाजारात आला होता. सायंकाळच्या वेळी तो दुचाकीने मुखेड गावचे नवीन कॅनॉल रोडने जात असतांना, त्यास महिला शेतात एकटीच काम करतांना दिसली होती. त्यावेळी त्याने शेतात जाऊन महिलेशी झटापट करुन तिचा उपरण्याने गळा आवळून तिला जीवे ठार केले. घटनेनंतर महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागीने जबरीने चोरुन नेले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक फौजदार रविंद्र वानखेडे, पोहवा नवनाथ सानप, जालिंदर खराटे, पोना विश्वनाथ काकड, नवनाथ वाघमोडे तसेच पोहवा उदय पाठक, प्रशांत पाटील, नंदू काळे, पोना सागर काकड प्रितम लोखंडे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, चापोना बापू खांडेकर आदींच्या पथकाने या गुन्ह्याच्या तपासकामी परिश्रम घेतले. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी तपास पथकास २५,०००/- रुपयांचे बक्षीस जाहीर करुन अभीनंदन केले आहे.