जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ या तालुक्याच्या ठिकाणी तसेच परिसरातील तालुक्यात आज सकाळी भुकंपाचे धक्के जाणवल्याने खळबळ उडाली आहे. मात्र असे असले तरी नागरिकांनी घाबरुन जावू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
आज सकाळी 10.35 वाजता भुकंपचे सौम्य धक्के भुसावळ येथे नागरिकांना जाणवले. 3.3 रिश्टर स्केल या प्रमाणात हे धक्के असल्याचे सांगण्यात आले. भुसावळसह यावल, सावदा आणि रावेर या ठिकाणी देखील भुकंपाचे तीन ते चार सेकंदाचे धक्के नागरिकांना जाणवले.मातीची व पत्र्याची घरे असलेल्या नागरिकांना हे धक्के मोठ्या प्रमाणात जाणवल्याचे सांगण्यात आले. भुसावळ शहरातील लहान मुलांची शाळेतून पालकांना बोलावून सुटी करण्यात आली. दरम्यान प्रशासकीय पातळीवर आपत्ती व्यवस्थापन कार्यरत झाले आहे. नागरिकांना घाबरुन जाण्याचे कारण नसल्याचे विविध माध्यमातून सांगितले जात आहे. भितीपोटी भुसावळचे नागरिक घरातून रस्त्यावर आले होते.