जळगाव : वाळू वाहतूकीचा व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी प्रभारी पोलिस अधिका-याच्या नावाने लाच मागणा-या आणि स्विकारणा-या होमगार्डसह पोलिस अंमलदाराविरुद्ध अडावद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश संतोष गोसावी असे पोलिस अंमलदाराचे तर चंद्रकांत काशिनाथ कोळी असे होमगार्डचे नाव आहे.
या घटनेतील तक्रारदाराचे स्वत:चे ट्रॅक्टर असून ते वाळू वाहतूकीचा व्यवसाय करतात. अडावद पोलीस स्टेशन हद्दीत या ट्रॅक्टरने वाळू वाहतूक करायची असल्यास साहेबांना दरमहा पाच हजार रुपये द्यावे लागतील असे पोलिस अंमलदार योगेश गोसावी यांच्या वतीने होमगार्ड चंद्रकांत कोळी याने तक्रारदारास सांगितले. तडजोडीअंती चार हजार रुपये देण्याघेण्याचे ठरले. पंचासमक्ष लाचेची मागणी आणि तडजोडीचे चार हजार रुपये स्विकारतांना होमगर्ड चंद्रकांत कोळी यास 28 जानेवारी रोजी रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी दोघांविरुद्ध अडावद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उप अधिक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, इश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ, राकेश दुसाने, पो.कॉ.सचिन चाटे,पो.कॉ.प्रणेश ठाकुर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.