जळगाव दि 29 (प्रतिनिधी) – आसोदा येथील सार्वजनिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज यांच्या 1985-86 च्या दहावी बॅच स्नेहसंमेलन आसोदा येथील रविंद्र कोल्हे यांच्या शेतात उत्साहात पार पडले. व्यासपीठावर डी. यू. भोळे, डी. सी. भोळे, पी. एच. चिरमाडे सर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष एम. डी. राणे सर उपस्थित होते. शाळेचे शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थीनी तब्बल 36 वर्षांनी पुन्हा भेटले. आपल्या जिवलग मित्र मैत्रिणी व शिक्षक सर्वांच्या चेहर्यावर आनंदाचे उधाण आले होते.
“माझे प्रिय विद्यार्थी हो, तुम्ही पन्नाशी पार केलीय आणि आम्ही पंच्याहत्तरी! दीर्घायुष्य जगण्यासाठी तुम्हाला आज जगण्याचा एक मंत्र देतो, तुम्ही आज पासून आहार निम्मे करा, दुप्पट आनंद वाढवणे, तीन पट चालण्याचा क्रम ठेवा, मन मोकळे करत रहा, सतत भले करत रहा..” असा मोलाचा सल्ला कार्यक्रमाचे अध्यक्ष एम. डी. राणे यांनी दिला. यावेळी डी. यू. भोळे सर यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या खोड्या, व्रात्यपणा आणि गमतीजमती सांगितल्या. यावेळी प्रमोद पाटील, श्यामकांत वाणी, चंद्रकांत पाटील, प्रवीण भोळे, ज्योत्स्ना भोळे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आरंभी आपसातील परिचय व स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन दिलीप ब-हाटे यांनी केले, सूत्रसंचालन मनीषा पाटील यांनी केले. आम्ही कुठेही असलो, कर्मभूमी, जन्मभूमी असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या आसोदा गावचे आम्ही आहोत हा अभिमान आहे. या स्नेहसंमेलनास 40 हून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या जोडीदारासह उपस्थित होते.