जळगाव : शेतातील घराचा कडीकोंडा तोडून शेतक-याचा 7 क्विंटल कापूस चोरुन नेणा-या चौघा चोरट्यांना चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. अजय जयवंत पाटील, प्रकाश उर्फ मुन्ना लक्ष्मण पाटील, चंद्रकांत उर्फ बंटी गोकूळ मोरे, शालीक अरुण पाटील, सुरेश उर्फ पप्पू राजेंद्र कोष्टी अशी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. यातील चंद्रकांत मोरे हा चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथील तर इतर सर्व जण रांजणगाव येथील रहिवासी आहेत.
चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथील मनोहर माधव पाटे यांच्या शेतातील घरातून 18 ते 19 डिसेंबर या कालावधीत 49 हजार रुपये किमतीचा सात क्विंटल कापूस चोरी झाला होता. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुप्त माहीतीसह तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे यातील पाचही चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आरोपींनी वापरलेले एक लाख रुपये किमतीचे पिक अप वाहन जप्त करण्यात आले आहे. आरोपी चंद्रकांत उर्फ बंटी गोकूळ मोरे याने चोरलेला कापूस पिलखोड येथील व्यापारी पवन दशरथ महाले याचेकडे ठेवला होता. चोरलेला कापूस आपल्या मालकीचा असल्याचे सांगून पवन महाले यांच्याकडे ठेवण्यात आला होता. या कापसाचे पैसे नंतर घेवून जावू असे सांगून चंद्रकांत मोरे याने महाले यांच्याकडे ठेवलेला कापूस जप्त करण्यात आला आहे. अशाप्रकारे गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि चोरी केलेला कापुस असा एकुण 1 लाख 49 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या पथकातील पोलीस उप निरीक्षक लोकेश पवार, सहायक फौजदार राजेंद्र साळुंखे, पोहेकॉ नंदलाल परदेशी, पोना शंकर जंजाळे, पोना मनोज पाटील, पोना संदिप माने, पोना भुपेश वंजारी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास सहायक फौजदार राजेंद्र साळुंखे करत आहेत. शेतक-यांनी आपला कापूस शेतात न ठेवता आपल्या घरात सुरक्षीत ठिकाणी ठेवावा, शेतात ठेवल्यास त्याच्या रखवालीसाठी राखणदार ठेवावेत असे आवाहन चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पो.नि. संजय ठेंगे यांनी केले आहे.