जळगाव : अल्पवयीन मुलींवर बलात्कार प्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनला दोन आणि जळगाव शहर पोलिस स्टेशनला एक असे तिन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी जळगाव शहर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील गर्भवती पिडीतेने एका पुरुष जातीच्या नवजात शिशुला जन्म दिला आहे. चोपडा शहर पोलिसात दाखल एका गुन्ह्यात पिडीतेसोबत संशयित आरोपीने काढलेले फोटो इंस्टाग्रामवर प्रसारीत केले असून दुस-या गुन्ह्यातील संशयीत आरोपीने पिडितेसोबत काढलेले फोटो समाजमाध्यमात प्रसारीत करण्याची तिला धमकी दिली आहे. अल्पवयीन मुलींसोबत होणारे लैंगिक अत्याचार हा एक गंभीर विषय होत असल्याचे या घटनांमधून दिसून येत आहे.
चोपडा शहर पोलिस स्टेशनला दाखल दोन्ही गुन्ह्यातील संशयीत आरोपी अटक असून या दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अजित सावळे करत आहेत. जळगाव शहर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यात एकुण चार संशयीत आरोपी आहेत. चौघे संशयीत आरोपी अटक करण्यात आले आहेत.
जळगाव शहर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी आणी पिडीत अल्पवयीन मुलगी हे भिन्न धर्माचे आहेत. सन 2019 ते 2023 या कालावधीत हा प्रकार घडला आहेत. लग्नाचे आमिष दाखवत संशयीत आरोपीने पिडीतेसोबत वेळोवेळी शरीरसंबंध प्रस्थापीत केले. त्यातून तिला गर्भधारणा झाली आणि तिने एका बाळाला जन्म दिला आहे. त्यानंतर त्याने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. मुख्य संशयीत आरोपीच्या सांगण्यावरुन इतर तिघांनी तिला मारहाण व शिवीगाळ केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक सर्जेराव क्षिरसागर करत आहेत.