जळगाव दि. १० – महात्मा गांधी पुण्यतिथी अर्थात हुतात्मा दिनी (३० जानेवारी) सुरु झालेल्या गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ग्राम संवाद सायकल यात्रेचा उद्या शनिवार, दि. ११ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता गांधीतीर्थ येथे समारोप होणार आहे. समारोप सत्रास प्रमुख पाहुणे म्हणून कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सल्लागार डाॅ. के. बी. पाटील यांची उपस्थिती लाभणार असुन जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष मा. अशोकभाऊ जैन अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. सायकल यात्रेतील सहभागी ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते अब्दुलभाई यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
म्हसावद, एरंडोल, कासोदा, पारोळा, तामसवाडी, गुढे, मेहुणबारे, चाळीसगाव, नगरदेवळा, पाचोरा, शेंदुर्णी, विटनेर असा प्रवास करुन हि यात्रा गांधीतीर्थ येथे पोहोचणार आहे. गांधीजींच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासह भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासावर आधारित प्रश्नमंजुषा, प्रदर्शनी, विविध खेळ, पपेट शो (बाहुल्यांचा खेळ), सामाजिक समस्यांवर जागरुकता करणारे सांस्कृतिक कार्यक्रम आदींद्वारे या यात्रेने हजारो विद्यार्थी व नागरिकांशी संवाद साधला. अमेरिकेसह महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, तामिळनाडू, गुजरात राज्यातील ५० यात्रींनी या सायकल यात्रेत सहभाग नोंदवला तर २३ जणांनी ती पुर्ण केली.