जळगाव दि. 11 (प्रतिनिधी)- कृषि विद्यापीठे, सरकारी यंत्रणा आणि कृषि उद्योजकांनी शेती संशोधनाविषयी एकत्रीतपणे कार्य केले तर शेतकऱ्यांना सन्मानस्थितीत आणता येईल आणि यातून देश सदृढ होऊन सुपर पॉवर होईल असाही विश्वास जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी व्यक्त केला. कांदा, लसूण व्यवस्थापन, शाश्वत उत्पादन व मूल्य साखळीतील उदयोन्मुख तंत्रज्ञान तसेच व्यापार.’ याविषयावर तिसऱ्या राष्ट्रीय परिसंवाद जैन हिल्सवरील गांधीतीर्थच्या, कस्तुरबा सभागृह येथे उद्घाटन सोहळ्याप्रसंगी अनिल जैन बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत नवतंत्रज्ञानाचा अवलंब करून एकरी सर्वाेच्च उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सपत्नीक स्व. सौ. कांताबाई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्काराने गौरव करण्यात आला. आकर्षक सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, साडी आणि २१ हजाराचा धनादेश असे ह्या पुरस्काराचे स्वरुप आहे.
जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., आय सी ए आर, कांदा व लसूण संशोधन संचालनालय राजगुरुनगर, पुणे, इंडियन सोसायटी ऑफ एलियम, राजगुरूनगर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या परिषेदचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून १४ फेब्रुवारी पर्यंत होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेत जगभरातील कांदा व लसूण शास्त्रज्ञ, तज्ज्ञ, संशोधक आणि अभ्यासक उपस्थित आहेत. परिषदेचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले. जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, आयएसए अध्यक्ष डॉ. के. ई. लवांडे, डॉ. एच. पी. सिंग, डॉ. एस. एन. पुरी, डॉ. विजय महाजन, डॉ. मेजर सिंग, डॉ. सुधाकर पांडे, डॉ. ए. जे. गुप्ता, डॉ. पी. के. गुप्ता, डॉ. अनिल ढाके, डॉ. बी. निरजा प्रभाकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन झाले.
यावेळी अनिल जैन पुढे बोलताना म्हणाले की, शेत, शेतकऱ्यांप्रती असलेली निष्ठा धर्मापेक्षाही मोठी आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. पांढरा कांदामध्ये संशोधन करून त्याचे उत्पादन वाढविले. करार शेतीतून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा जैन इरिगेशनच्या माध्यमातून मिळवून दिला. व्यवसाय वृद्धीमध्ये शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांची मोलाची भागीदारी असून शेतकऱ्याने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली कंपनी आहे. समाजाचा कणा असलेला शेतकऱ्याला संशोधन तंत्रज्ञान सहज सोप्या पध्दतीने प्राप्त व्हावे हाच कुठल्याही संशोधनाचा उद्देश असावा अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शास्त्रज्ञांनी नवीन जातींवर संशोधन करावे यासाठी जैन इरिगेशन सर्वतोपरी प्रोत्साहन देईल असेही ते म्हणाले. विज्ञान तंत्रज्ञानासोबत शेतकऱ्यांची भागिदारी हेच कंपनीचे यश आहे. अल्पभुधारक आदिवासी शेतकरी विक्रमी १७ ते १८ टन एकरी पांढरा कांद्याचे उत्पादन घेत आहे. यातून ८० लाखाच्यावर शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणले आहेत. कांदा निर्जलीकरणातून मोठ्या प्रमाणात विदेशी चलन प्राप्त करता येते हे कंपनीने दाखवून दिले. आजही ५० टक्के लोक कृषिक्षेत्रावर अवलंबून आहे. यात सकारात्मक बदल झाले तर समृद्धीच्या मार्ग गवसेल यासाठी सर्व शास्त्रज्ञ, विद्यापिठे, सरकारे आणि कृषि उद्योजक यांनी एकत्रिपणे कार्य केले पाहिजे असेही आवाहन यावेळी अनिल जैन यांनी उपस्थितांना केले.
प्रास्ताविक डॉ. के. ई. लवांडे यांनी केले. त्यात ते म्हणाले, भवरलालजी जैन यांनी अवघ्या सात हजार रूपयांच्या भांडवलावर आज १२ हजार कुटुंबांना रोजगार उपलब्ध केला. जलपुर्नभरण, मृदसंधारण, ठिबक सिंचन, सौर ऊर्जा व जैवतंत्रज्ञानातून शेतकऱ्यांना उन्नतीचा मार्ग दाखविला. या नाविन्याचा ध्यास घेणाऱ्या जैन इरिगेशनला ही परिषद सर्वांसाठी उपयुक्त ठरेल असे ते म्हणाले. डॉ. मेजर सिंग यांनी कांदा साठवण या मार्गदर्शन केले. प्रत्येक पिकांमध्ये हायब्रीड आहे मात्र कांदा व लसुणमध्ये नाही त्यावर संशोधन व्हावे असी इच्छा व्यक्त करीत जागतिक मागणीनुसार निर्यातीच्या दृष्टीने मानांकन पाळून साठवणूक केंद्र तयार केले पाहिजे असे मनाेगत डॉ. मेजर सिंग यांनी व्यक्त केले. डॉ. सुधाकर पांडे यांनी कांदा पिकाची उत्पादकता कशी वाढता येईल यावर प्रकाश टाकला. चांगल्या दर्जाचे बी जे निर्यातीसह प्रक्रिया उद्योगालाही पुरक असेल त्यावर संशोधन करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. भारतीय कांद्याची जी चव आहे ती अमेरिकेसह युरोपीयन कांदाची नाही असेही ते यावेळी म्हणाले.
डॉ. एच. पी. सिंग यांनी शेतकऱ्यांच्या फायदासाठी भाजीपाल्यांमध्ये ज्याप्रमाणे हायब्रीड चे संशोधन समोर आले त्याप्रमाणे कांदा व लसूण मध्येही यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. टिश्यूकल्चरमध्ये केळी पिकातून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे हेच टिश्यूकल्चर तंत्रज्ञान कांदा पिकातही आणता येईल का यासाठी संशोधनात्मक प्रयत्न केले पाहिजे असेही डॉ. एच. पी. सिंग म्हणाले. डॉ. एस. एन. पुरी यांनी प्रमुख पाहुणे म्हणुन मार्गदर्शन करताना कांदावर परदेशातून कीड आणि रोगांचे आक्रमण होत आहे. याकडे लक्ष वेधले. यासंबंधी आपल्याला जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. कांदातील टीएएसएस वाढावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. संशोधन करणाऱ्या संस्थामध्ये समन्वय असावा असेही डॉ. एस. एन. पुरी म्हणाले. दीपक चांदोरकर यांनी गुरूवंदना म्हटली. सुत्रसंचालन डॉ. राजीव काळे यांनी केले. डॉ. विजय महाजन यांनी आभार मानले.
जैन फार्मफ्रेश फुड्सचा स्क्रोल ऑफ ओनर्स आणि अवार्ड ऑफ एक्सलेंस ने गौरव – नॅशनल हॉर्टिकल्चर रिसर्च फाउंडेशन यांना ओनर्स पुरस्काराने मान्यवरांच्याहस्ते गौरवण्यात आले. जैन फार्मफ्रेश फुड्स लिमिटेड यांचा स्क्रोल ऑफ ओनर्स आणि अॅवार्ड ऑफ एक्सलेंसने गौरव करण्यात आले. हा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार डॉ. एच. पी. सिंग, डॉ. के. ई. लवांडे, डॉ. एस. एन पुरी यांच्या मान्यवरांच्याहस्ते जैन फार्मफ्रेश फुडूस कंपनीच्या वतीने अनिल जैन, डॉ. अनिल ढाके, गौतम देसर्डा, रोशन शहा, संजय पारख, सुनील गुप्ता, व्ही. पी. पाटील यांनी स्वीकारला. जैन फार्मफ्रेश फूडस लि. चे कार्य अधोरेखित करत शेतकऱ्यांच्या बांधावर कृषि उच्च तंत्रज्ञान पोहचविणे, करार शेतीच्या माध्यमातून हमी भाव देऊन शेतकऱ्यांच्या उन्नतीमध्ये सहभागी झाल्याने हा सन्मान करण्यात आला.
स्व. सौ. कांताबाई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्कार – (वर्ष – २०१९-२० चे विजेते) – प्रकाश बाबुलाल चौबे यांच्या वतिने त्यांचे बंधू वासुदेव नारायण चौबे, (नशिराबाद ता. जि. जळगाव) यांनी हा पुरस्कार स्वीकारला., अंबालाल परशुराम पाटील (दामळदा ता.शहादा, जिल्हा नंदुरबार), संतोष लालसिंग पवार, (दिवडिया ता. पानसेमल, जि.बडवाणी मध्यप्रदेश) शरद काशिनाथ पाटील (अंजनविहिरे ता. शिंदखेडा जि. धुळे, (वर्ष- २०२०-२१ चे विजेते) – शेख साजिद शेख सत्तार (कर्जोद ता. रावेर जि. जळगाव.), नंदकिशोर भालचंद्र भामरे (लोणखेडी ता. साक्री जि. धुळे), राहुल गोकुळ पाटील (डाबीयाखेडा ता. नेपानगर जि. बऱ्हाणपूर मध्यप्रदेश), दीपक राजाराम पाटील (होळ ता. जि नंदुरबार) (वर्ष- २०२१-२२ चे विजेते) – रमेश भुरिया वास्कले (निसरपूर ता. पानसेमल जि.बडवाणी, मध्यप्रदेश), विजय युवराज महाडिक (विटनेर ता. जळगाव), भरत कांतीलाल पाटील (तळवे ता. तळोदा जि. नंदुरबार), शांताराम भीमराव शेलार (ऐंचाळे ता. साक्री जि.धुळे) ह्या शेतकर्यांचा सपत्नीक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कार वितरण समारंभाचे सूत्रसंचालन जैन फार्मफ्रेश फुड्स लि.चे पांढरा कांदा व अन्य पिकांचे करार शेती प्रमुख गौतम देसर्डा यांनी केले.
कमलसिंग पावरा यांनी डॉ. एस. एन. पुरी आणि अनिल जैन यांना धनुष्यबाण भेट दिले. स्व. सौ कांताबाई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्कारार्थ २०१२ चे रावेर तालुक्यातील आहेरवाडी येथील रविंद्र शामराव पाटील यांनी प्रति एकर २७ मेट्रिक टन कांदा पिकविले त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने विश्वनाथ गोकुळ साबळे यांनी मनोगत व्यक्त केले.