राष्ट्रीय कांदा, लसूण चर्चासत्रातून जैन हिल्सवर कांदा पिकावर मंथन

जळगाव दि.१२ प्रतिनिधी –  कांदा व लसुण पिकाच्या उत्पादकतेत सूक्ष्मसिंचन प्रणालीचा वापर, कीड नियंत्रणासाठी कमी खर्चात करावयाचे प्रयत्न, फर्टीगेशन यंत्रणेतून खतांचा कार्यक्षम वापर आणि मल्चिंग पेपरसह अन्य पद्धती वापरून काटेकोर व्यवस्थापनातून वाढ मिळविणे शक्य आहे. त्यासाठी नाविन्याचा तंत्रज्ञानात सातत्य असावे. यातून शाश्वत उत्पादन हाती मिळू शकते, असा सूर जळगाव जैन हिल्स येथे आयोजित राष्ट्रीय कांदा व लसूण चर्चासत्रात उमटला.

या चर्चासत्राचा रविवारी (ता.12) दुसरा दिवस होता. शास्त्रज्ञ, अभ्यासकांनी उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर विविध पैलू लक्षात घेवून आपले पेपर सादरीकरण व मौखिक सादरीकरण केले.  जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. जळगाव व इंडियन सोसायटी ऑफ एलियम्स (आयएसए, राजगुरूनगर, पुणे) येथील राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र यांच्यातर्फे जैन हिल्स येथे तिसऱ्या राष्ट्रीय चर्चासत्रात विविध विषयांवर मंथन झाले. 

रविवारच्या पहिल्या तांत्रिक सत्राच्या अध्यक्षस्थानी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. आर. गडाख होते. राजगुरूनगर येथील कांदा व लसूण संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. ए. थंगासामी यांनी कांदा व लसूण पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापनावर पेपर सादर केला. ते म्हणाले, खरीप, उशिराचा खरीप व रब्बीमधील कांदा पिकास अन्नद्रव्यांची वेगवेगळ्या प्रमाणात मात्रा हवी असते. त्यासंबंधी कांदा व लसूण संशोधन केंद्राने शिफारसी केल्या आहेत. कांदा बियाणे रोपण, पुर्नलागवड आणि वाढीच्या काळात हे अन्नद्रव्य व्यवस्थापन व्हायला हवे. पाण्यात विरखळणारी अन्नद्रव्ये व इतर माध्यमातून उपलब्ध होणारी अन्नद्रव्ये आहेत. त्यात जमिनीची स्थिती महत्त्वाची असते, असे ते म्हणाले. जैन इरिगेशन सिस्टीम्सचे कृषीतज्ज्ञ डॉ. पी. सोमण यांनी कांदा पाणी व्यवस्थापनाची माहिती दिली. ते म्हणाले, सूक्ष्मसिंचनाच्या मदतीने पीक उत्पादन वाढले आहे. पाण्याची काटकसर करणेही त्यात शक्य झाले आहे. तुषार व ठिबक सिंचन कांदा पिकासाठी लाभदायी आहे. आंध्र प्रदेशातील कुर्नूल भागातील शेतकऱ्यांची केस स्टडीही त्यांनी सादर केली. सूक्ष्मसिंचन प्रणालीची वितरण क्षमता (डीस्चार्ज) किती आहे, हेदेखील महत्त्वाचे आहे. कारण यातून किती पाणी दिले जाते, हे लक्षात येते. त्याच्या नोंदी असायला हव्यात. कांद्याच्या १०० दिवसांच्या काळात ५०० मिलीमीटर पाणी देणे आवश्यक आहे. अतिपाण्याचा वापर टाळण्यासाठीदेखील यंत्रणा उपलब्ध आहे, असेही ते म्हणाले. 

दिल्ली येथील कृषी अनुसंधान परिषदेतील भाजीपाला विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. भूपाल सिंह यांनी कांदा बिजोत्पादनातील आव्हाने याबाबत पेपर सादर केला. ते म्हणाले, कांदा बिजोत्पादनात बियाण्याची शुद्धता महत्त्वाची असते. एकाच जातीच्या किंवा वाणाचे बिजोत्पादन  घेताना दोन प्रक्षेत्रातील अंतर ७०० मीटरवर हवे आहे. यामुळे बियाण्याची शुद्धता जोपासता येते. शुद्धता जोपासण्यासाठी वाण निवडही महत्त्वाची असते.  आयएआरआय नवी दिल्ली येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ विश्वनाथ यांनीही  कांदा व लसूण बी निर्मीतीमधील आव्हाणे यावर संशोधनात्मक मार्गदर्शन केले. या उपक्रमात बियाणे उत्पादक कंपन्यांनीची भूमिका व इतर मुद्दे त्यांनी विषद केले. ज्ञानेश्वर मदने, संदीपकुमार दत्ता, टी. एल. भुतिया, आर. लाहा, विजय महाजन, एस. एम. गावंडे, एम. एम. देशमुख, एस. आर. भोपळे, ए. डी. वराडे, बी. जे. पटले, कृषितज्ज्ञ बी. डी. जडे, ए. आर. पिंपळे, डी. एस. फाड, एस. बी. वडतकर, एन. बी. झांजड, एन. के. हिडू, गणेश चौधरी, हनुमान राम, राहुल देव, बी. एम. पांडेय, ए. पटनायक, लक्ष्मीकांत, व्ही. सुचित्रा, ए. भागवान, बी. निरजा प्रभाकर, सईड अली, बी. के. दुबे, चंदन तिवारी, पी. के. गुप्ता, अनिता कुमारी, विणा जोशी आदींनी मौखिक सादरीकरण केले. यामध्ये सेंद्रीय शेती, ड्रीप इरिगेशन, विद्रांव्य खतांचा प्रभावी वापर, खरिप कांदा उत्पादन याविषयांवर चर्चा करण्यात आले. सहभागी संशोधक व विद्यार्थ्यांना पोस्टर तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. संपूर्ण स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना संशोधकांना पाऊनतासाचा वेळ दिला होता.  बिजोउत्पादन समस्या व त्यावरील उपाय योजना यावर मंथन झाले. कृषि निवष्ठा कंपनी बियाणे उत्पादन करण्याऱ्या कंपन्यांनी या सत्रात सहभाग घेतला. पोस्टर स्पर्धेचा निकाल चर्चासत्राच्या समारोपावेळी जाहिर केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here