मोटरसायकलसह ट्रॅक्टरच्या बॅट-या चोरणा-या टोळीस अटक

जळगाव : मोटारसायकल व ट्रॅक्टरच्या बॅट-या चोरणा-या  चौघांसह भंगार विक्रेत्यास पारोळा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. 31 ऑक्टोबर 2022 रोजी पारोळा तालुक्यातील राजवड आणि शेवाळे बुद्रुक या गावातील ट्रॅक्टरच्या सहा बॅट-या चोरी गेल्या होत्या. तिस  हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याप्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान देवेंद्र उर्फ मोठा शिवा नाईक (रा. राजीव गांधी नगर पारोळा), महेंद्र उर्फ विकास उदीलाल मोरे (रा. शेळावे खुर्द), भिवसन उर्फ कमलेश मगन भिल (रा. शेळावे बु), महेश संजय पाटील (रा. शेळावे खुर्द) या चौघांनीच हा गुन्हा केला असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांना ताब्यात घेण्यात आले. महेश संजय पाटील याच्या मदतीने आपण हा गुन्हा केला असल्याची कबुली उर्वरीत तिघांनी दिली.

याशिवाय पारोळा शहरातील रथ गल्ली परिसरातून आणि धरणगाव शहरातील बाजारपेठेतून प्रत्येकी एक अशा  दोन मोटारसायकली चोरल्याची कबुली देवेंद्र उर्फ मोठा शिवा नाईक याने दिली आहे. धुळे येथे नातेवाईकांकडे ठेवण्यात आलेल्या चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच घरात लपवून ठेवलेली ट्रॅक्टरची बॅटरी देवेंद्र नाईक याच्याकडून जप्त करण्यात आली  आहे. चोरलेल्या इतर बॅट-या  एरंडोल येथील भंगार विक्रेता सईद शेख इब्राहीम याला विक्री केल्याचे अटकेतील आरोपींनी कबुल केले. त्यामुळे त्याला देखील अटक करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक गंभीरराव शिंदे, हे.कॉ. सुधीर चौधरी, पो.ना. योगेश जाधव, पो. ना. संदीप सातपुते, पो. कॉ. अभिजित पाटील, पो. कॉ. राहुल पाटील, पो. कॉ. आशिष गायकवाड, पो.कॉ. राहुल कोळी, पो. कॉ. किशोर भोई, पो. कॉ. हेमचंद्र साबे, होमगार्ड गोपाळ पाटील आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. पारोळा हद्दीतील शेतक-यांसह गावक-यांनी या कामगिरीचे कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here