जळगाव : तरुणीचा पाठलाग करुन तिच्याशी लग्नाची गळ घालत विविध मार्गांनी गेल्या दोन वर्षांपासून त्रास देणा-या तरुणाविरुद्ध तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार मेहुणबारे पोलिस स्टेशनला विनयभंगासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण घेणारी तक्रारदार पिडीत तरुणी चाळीसगाव तालुक्यातील आहे. समाधान पाटील असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
सन 2021 ते 2023 या कालावधीत वेळोवेळी घडलेल्या या घटनेविरुद्ध 15 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत माझ्याशी लग्न कर असे समाधान तरुणीला म्हणाला. त्यावर तरुणीने त्याला नकार दिला. आपल्याला नकार मिळाल्याचे वाईट वाटल्याने त्याने गावात येवून तिच्यावर लक्ष ठेवत तिचा पाठलाग करुन तिला शिवीगाळ व दमदाटी केली.
प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर तिच्या मोबाईलवर मी तुमच्या शेतात फाशी घेतो आणि तुझ्यासह घरातील सर्वांची नावे टाकतो, माझा जगून काय फायदा? अशा धमकीचा टेक्स्ट मेसेज पाठवला. तुझे पप्पा रस्त्याने जातात. माझ्याकडे मोठे वाहन असून त्यांचा अपघात घडवून आणतो अशी धमकी दिली. याशिवाय तिचा साखरपुडा झालेल्या नियोजीत वराची माहिती मिळवून त्याच्यासोबत फेसबुकवर चॅटींग सुरु केली. या चॅटींगच्या माध्यमातून तरुणीचा विवाह मोडण्याचा प्रयत्न केला. या बदनामीकारक चर्चेसह होत असलेल्या त्रासाला वैतागून तरुणीणे मेहुणबारे पोलिस स्टेशनला विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिस उप निरीक्षक राजु सांगळे पुढील तपास करत आहेत.