जळगाव : सावदा येथील बडा आखाडा, रविवार पेठ भागात दोन गटात तुंबळ हाणामारीची घटना सुरु असतांना वाद मिटवण्यासाठी आलेल्या पोलिस उपनिरीक्षकास धक्काबुक्कीसह मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी साडेचार वाजता घडली होती. या घटनेप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील दोघांना न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस कर्मचारी मोहसीन खान शब्बीर खान पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास बडा आखाडा, रविवार पेठ परीसरात संशयित शेख साबीर उर्फ बडा बाबू शेख मंजूर, शेख गुलाब शेख मंजू (दोन्ही रा. बडा आखाडा, सावदा), रीतेश संतोष पाटील, उल्हास कडू पाटील (सावदा) व दोन्हीकडील 7 ते 8 संशयितांची हाणामारी सुरु होती.
घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत सुरु असलेला वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. उपस्थित पोलिसांना संशयितांनी तुम्ही आमच्या वादात पडू नका असे म्हणत पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले यांच्या उजव्या हातावर मारहाण करण्यात आली.
सार्वजनिक ठिकाणी पोलिसांच्या आवाहनास न जुमानता हाणामारी केल्या प्रकरणी चौघांविरुद्ध सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी शेख साबीर उर्फ बडा बाबू शेख मंजूर, उल्हास कडू पाटील यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे करत आहेत.