पणजी : गोवा गुन्हे अन्वेशन विभागाने वागातोर येथील “फिरंगी विलास” नामक बंगल्यात स्वातंत्र्यदिनाच्या मध्यरात्री रेव्ह पार्टीवर छापा टाकला होता. या छाप्यात अमली पदार्थ जप्त करण्यत आले तसेच 23 जणांना अटक करण्यात आली.
या कारवाईत बॉलीवूड अभिनेता कपिल झावेरी यास अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अटकेतील बॉलीवूड अभिनेता कपिल झावेरी हा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पुष्पगुच्छ देत असल्याचा जुना फोटो व्हायरल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणात पोलिसांना पोलिसांना तपासाची मोकळीक असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री म्हणून कुणी आपल्याला भेटत असेल व त्याने गुन्हा केला असेल तर गुन्हयाची शिक्षा ही त्याला भोगावीच लागणार आहे असेही मुख्यमंत्री सावंत यांनी पुढे म्हटले आहे.
या छाप्यामुळे रेव्ह पार्टीचे बॉलिवूड संयोजन उघड झाले आहे. ही पार्टी ज्या फिरंगी विलास बंगल्यात झाली तो बंगला बॉलिवूड अभिनेता कपील मिश्रा यांच्या मालकीचे असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. बंगला मालक कपील मिश्रा हा देखील त्या पार्टीत सहभागी झाला होता. पोलिसांनी त्याला देखील अटक केली आहे. सर्व संशयीतांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
क्राईम ब्रँचचे पोलिस निरीक्षक राहूल परब, नारायण चिमुलकर, महिला उपनिरीक्षक रिमा नाईक व संध्या गुप्ता यांचा पथकाने ही कारवाई पुर्ण केली. सर्व संशयितांवर सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणल्याचा तसेच अंमली पदार्थांच्या वापराचा गुन्हा दाखल केला आहे.