नवी मुंबई : तरुणीचा शोध घेत पुणे येथून आलेल्या टोळीने तरुणीच्या भावाला जबर मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री कोपर खैरणेत घडली होती. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी पाठलाग करत पाच जणांच्या टोळीला अटक करण्यात यश मिळवले. या टोळीकडून हॉकी स्टिक, चाकू, सूरा अशी घातक शस्त्रे जप्त करण्यात आली.
कोपर खैरणे सेक्टर 8 परिसरातील उद्यानात रविवारच्या रात्री हा मारहाणीचा प्रकार घडला. त्याठिकाणी कार मधून काही तरुण आले होते. त्यांनी एका तरुणाला बेदम मारहाण करत पलायन केले होते. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी पाठलाग करत टोळीला पकडले. आरोपींच्या कारचा भर पावसात दुचाकीवरुन पोलिसांनी पाठलाग करत कारसह पाचही जणांना ताब्यात घेतले.
सर्व हल्लेखोर मुळचे पुणे येथील रहिवासी आहेत. अविनाश शंकर खटापे, भरत लहू पाटील, संदीप निवृत्ती दरडीगे, अनिल दत्ता पिलाने व सुमित बाबूजी शिंदे अशी त्या सर्वांची नावे आहेत. त्यांच्या कारमधून हॉकी स्किट, चाकू व सुरा अशी घातक शस्त्रे जप्त करण्यात आली. हे सर्व जण एका तरुणीचा शोध घेत पुणे येथून आले होते. त्यांचा सामना तरुणीच्या भावासोबत झाला. त्या तरुणीच्या भावावर त्यांनी हल्ला चढवला. मात्र ते पोलिसांच्या तावडीत पलायन करतांना सापडले. त्यांना अटक करण्यात आली.