नाशिकला माजी सैनीकाच्या खूनाचा गुन्हा उघडकीस

नाशिक : धावत्या वाहनाचा कट लागल्याने झालेल्या वादातून माजी सैनिकाच्या अंगावर  डिझेल टाकून त्याचा कारसह जाळून खून केल्याची घटना नाशिक ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणली आहे. घटना घडल्यानंतर सहा महिन्यांनी हा गुन्हा उघडकीस आला आहे. या गुन्ह्याच्या तपासकामाबद्दल नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांनी तपास पथकाला 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करुन अभिनंदन केले आहे.

दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या पुर्वी घोटी पोलिस स्टेशन हद्दीत आंबेवाडी गाव शिवारात वन विभागाच्या हद्दतील रस्त्यावर एक जळालेली चारचाकी आढळून आली होती. त्या कारमध्ये एका अज्ञात इसमाचे अवशेष जळालेल्या अवस्थेत आढळून आले होते. या घटनेप्रकरणी घोटी पोलीस स्टेशनला सुरुवातीला 72/22 या क्रमांकाने अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती.

जळालेली हुंदाई सॅन्ट्रो कार संदीप पुंजाराम गुंजाळ (रा. न्हनावे, ता. चांदवड, जि. नाशिक) यांच्या मालकीची असल्याची माहिती पोलिस तपासादरम्यान मिळाली होती. मृतदेहाची ओळख निश्चित करण्यासाठी डिएनए सॅम्पल घेण्यात आले होते. तपासाअंती या घटनेप्रकरणी घोटी पोलिस स्टेशनला गु.र.न. 77/23 भा.द.वि. 302, 201 नुसार अज्ञात मारेक-याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मयत संदीप पुंजाराम गुंजाळ हे माजी सैनिक होते. ते समृध्दी महामार्ग साउथ पोल, इगतपुरी येथे सिक्युरिटीचे काम करत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती. घटनेच्या दिवशी 30 ऑगस्ट 2022 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ते साउथ पोल समृध्दी महामार्ग येथून त्यांची सॅन्ट्रो कार घेवून गेले होते.  सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांचा जळीत अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. 

नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे व उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांनी हा खूनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. हेमंत पाटील व त्यांच्या पथकाला सुचना दिल्या होत्या. मयत संदीप गुंजाळ हे घटनेच्या मध्यरात्री त्यांच्या ताब्यातील कारने भावली धरण परिसराकडे गेले होते. वाटेत नांदगाव सदो येथे एका दुचाकीवरील इसमांशी कट मारल्याच्या कारणावरुन त्यांचा वाद झाला होता. 

नांदगाव सदो शिवारातून संशयीत आकाश चंद्रकांत भोईर (रा. नांदगाव सदो, ता. इगतपुरी) व एका अल्पवयीन बालकास ताब्यात घेवून गुन्हयासंदर्भात सखोल चौकशी करण्यात  आली होती.  चौकशी व तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सुमारे सहा महीन्यांपूर्वी आकाश भोईर आणि त्याचा अल्पवयीन साथीदार असे दोघे समृध्दी महामार्गाच्या पूलाखाली सर्कलजवळून नांदगाव सदो गावाकडे मोटार सायकलने जात होते. त्याचवेळी पलीकडून मयत संदीप गुंजाळ यांच्या कारचा दोघांच्या दुचाकीला कट लागला.

कारचा कट लागल्याने मोटार सायकलवरील दोघांनी कारचालक गुंजाळ यांना शिवीगाळ केली. त्यामुळे संदीप गुंजाळ यांनी गाडी थांबवून खाली उतरुन प्रत्युतरादाखल दोघांना  शिवीगाळ केली. बघता बघता दोघांमधे वाद सुरु झाला. वाद सुरु असतांना दोघांनी मिळून संदीप गुंजाळ यांच्या पोटावर चॉपरने वार करुन त्यांना जखमी करण्यातआले. त्यात ते जीवे ठार झाले. मयत संदीप गुंजाळ यांना त्यांच्याच कारमधे टाकून भावली धरणाच्या दिशेने घाटात नेवून   निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबवण्यात आली. त्यांना चालक सिटवर बसवून त्यांच्याच गाडीतील डिझेल कॅनमधील डिझेल त्यांच्या अंगावर आणि कारवर ओतण्यात आले. डीझेल ओतून त्यांना कारसह जाळून टाकण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकातील हे.कॉ. गणेश वराडे, पोना संदीप हांडगे, भाऊसाहेब टिळे, प्रदिप बहिरम, हेमंत गिलबिले आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here