तुझा फोटो आमच्या मोबाईलमधे आहे असे सांगत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

जळगाव : अल्पवयीन मुलगी गावातील तरुणासोबत धुळे येथील एका कॅफे सेंटरमधे सापडली आणि दोघांचा फोटो आपण मोबाईलमधे कैद केल्याचे सांगून गावात बदनामी करु अशी धमकी देत अश्लील बोलणा-या दोघांविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला विनयभंगासह बालकांचे लैंगिक अपराधापासून सरंक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांपैकी एक अल्पवयीन असून दुस-या सज्ञान तरुणास अटक करण्यात आली आहे.

पारोळा तालुक्यातील एका सतरा वर्षाच्या विद्यार्थी मुलीने याप्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. ती मुलगी गावातीलच एका तरुणासोबत धुळे येथील कॅफे सेंटरमधे आढळून आल्याचे दोघा संशयीत आरोपींचे म्हणणे आहे. दोघांचे फोटो आपल्या मोबाईलमधे असल्याचा दावा दोघे संशयीत तरुण करत होते. त्या दाव्याला अनुसरुन दोघे त्या अल्पवयीन मुलीची बदनामी करण्याची तिला वेळोवेळी धमकी देत होते. त्या बळावर ते तिला अश्लिल शब्दात बोलून त्रास देत होते.

याप्रकरणी मुलीने अल्पवयीन मुलाच्या वडीलांकडे आपली व्यथा कथन केली. त्याचा राग आल्याने दोघांनी ती धुळे येथे महाविद्यालयात जात असतांना गावातील बस स्थानकानजीक तिला गाठून अश्लिल हावभाव करुन तिला शिवीगाळ करत बदनामीची धमकी दिली. सज्ञान तरुणास अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिस उप निरीक्षक गंभीर शिंदे करत आहेत.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here